रत्नागिरी शहर काँग्रेसतर्फे महागाईविरोधात जनजागरण अभियान

0

रत्नागिरी : देशभरात महागाईने आगडोंब उसळला आहे. महागाईचा हा भस्मासूर रोखण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आले आहे. महागाई विरोधात काँग्रेस देशभरात आक्रमक झाली असून राज्यस्तरावर या विरोधात अभियान राबविले जात आहे. रत्नागिरी शहर काँग्रेसने रत्नागिरी शहरात महागाईविरोधात जनजागृती अभियान राबविले आहे. या आंदोलनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून महागाईविरोधात नागरिकांमध्ये असंतोष असल्याचे रत्नागिरी शहर काँग्रेस अध्यक्ष राकेश चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार आणि रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड तसेच रत्नागिरी जिल्हा जन जागरण अभियान निरीक्षक दीपक निवाते यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत अभियान राबविण्यात आले. अच्छे दिन आयेंगे असा नारा देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने गेल्या सात वर्षात देशवासियांना विविध समस्या, अडचणीच भेट दिल्या आहेत. डिझेल पेट्रोल गॅस यांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे तर अन्नधान्याचे दर हे आकाशाला भिडले आहेत. लोकांना भाजीपाला परवडेनासा झाला आहे. काँग्रेस सरकार देशात असताना जनतेला अशी झळ सोसावी लागली नव्हती. त्यामुळे जनतेच्या समस्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महागाईविरोधात काँग्रेसने देशभरात जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत रत्नागिरी शहरातील राजीवडा आठवडा बाजार, मिरकरवाडा तसेच मारुती मंदिर या परिसरात काँग्रेसतर्फे कॉर्नर सभा घेण्यात आल्या. त्यात महागाईविरोधात जनजागृती करण्यात आली. तसेच शहरातील अन्य भागात शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील नागरिकांची गाठीभेटी घेत त्यांच्या मनातील महागाईच्या विरोधातील खदखद जाणून घेतली. देशवासीयांना खऱ्या अर्थाने चांगले दिवस यावे असे वाटत असेल तर त्यांनी येत्या निवडणुकीत केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पराभूत करावे आणि काँग्रेस पक्षाला विजयी करावे, असे आवाहन यावेळी शहर काँग्रेसतर्फे करण्यात आले. या जनजागृती अभियानात शहर अध्यक्ष राकेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष रमेश शहा, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, जिल्हा सरचिटणीस बंडू सावंत, काँग्रेस नेते अनिरुद्ध कांबळे, जिल्हा सरचिटणीस बाळा मयेकर, तालुका अध्यक्ष प्रसाद उपळेकर, महिला तालुका अध्यक्ष रिझवाना शेख, महिला शहर अध्यक्ष नूतन गोरीवले,जिल्हा सरचिटणीस अश्फाक कादरी, तालुका खजीनदार नाथा आडाव यानी सहभाग घेतला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:54 PM 29-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here