‘मंत्रालय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत कार्यशाळा

0

रत्नागिरी : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या दूरदृष्टीतून ‘मंत्रालय आपल्या दारी’ या विशेष उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्था व उच्च व तंत्रशिक्षणाशी संबंधित इतर घटकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शनिवारी रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली. यामध्ये उच्च शिक्षण सहसंचालनालयाने तक्रारदारांच्या समस्या ऐकून ३५ प्रकरणे सोडविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात आले. या शिबिरासाठी कोकण विभागीय उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप, प्रशासकीय अधिकारी ज्ञानदा कदम आणि युवराज साळुखे, लेखाधिकारी
शेखर खामकर आणि अन्य सर्व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनावेळी शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप यांनी विद्यार्थ्यांना असणाऱ्या विविध शिष्यवृत्ती आणि अन्य आर्थिक लाभ याविषयी माहिती दिली. संबंधित माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वच महाविद्यालयांनी जागृतीपर कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन सर्व उपस्थित प्राचार्यांना केले. ते पुढे म्हणाले की, शिक्षण संस्थांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान करणारे शिक्षण देण्यावर विशेष भर द्यावा. दरम्यान, या कार्यशाळेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ३५ प्रकरणे दाखल केली होती. कार्यशाळेसाठी एकूण ८५ व्यक्ती उपस्थित होत्या. उच्च शिक्षण सहसंचालनालयाने तक्रारदारांच्या बाजू ऐकून घेऊन संबंधितांना निर्धारित वेळेत योग्य ती कार्यवाही करण्याचे तत्काळ निर्देश दिले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे दापोली विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी कोव्हिड प्रतिबंधक लसीचा एक डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्याविषयी शासकीय स्तरावर निर्णय घेण्याविषयी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांच्या वतीने विनंती केली. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अधीन राहून लवकरच हा विषय संबंधित समितीच्या सभेमध्ये मांडण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे डॉ. संजय जगताप यांनी सांगितले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सोनाली कदम यांनी सूत्रसंचालन केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:46 AM 30-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here