कोविडच्या काळात नर्सेसचे काम अमूल्य : डॉ. इंदुराणी जाखड

0

रत्नागिरी : नर्सिंग आणि डॉक्टर हे प्रोफेशन वेगळे आहे. डॉक्टर निदान करतात व नर्सेस औषधोपचाराची अंमलबजावणी करतात. त्यांचा रुग्णाशी संपर्क असतो. रुग्ण औषध घेत नसेल तर त्यांचे समुपदेशन करावे लागते. रुग्ण बरा झाला पाहिजे याची जबाबदारी नर्सेसवर असते. या कामातून सुखसमाधान मिळते, या कामाची तुलना कशाशीच करता येत नाही. हे एक पवित्र कार्य आहे. रुग्णाचे आईवडीलही आपणच असतो. ही सेवा आपुलकीने करावी. कोविड महामारीच्या वेळी अडचणीच्या काळात माजी आमदार बाळ माने यांनी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन रुग्णालयात सेवा बजावण्यास पाठवले. या विद्यार्थिनींनी चांगल्या पद्धतीने काम केले. त्यामुळे रुग्णालय चालू राहिले आणि त्यातून बऱ्याच जणांचे प्राणही वाचवता आले. याबद्दल दि यश फाउंडेशन व श्री. माने आणि कॉलेजचे कौतुक करावेसे वाटते, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी काढले. दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या लॅंप लायटिंग कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. मराठा भवन येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त, माजी आमदार बाळ माने उपस्थित होते, तर व्यासपीठावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, ऑप्थल्मोलॉजिस्ट सूरज जगवानी, सहव्यवस्थापकीय विश्वस्त सौ. माधवी माने, हेमंतराव माने, कॉलेजच्या रजिस्ट्रार सौ. शलाका लाड आदी उपस्थित होते. या वेळी बाळ माने म्हणाले की, हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. १९९९ मध्ये ३४ व्या वर्षी आमदार झालो. २००२ मध्ये मातोश्रींचे निधन झाले. जगातली सर्व साधने मला उपलब्ध होती. परंतु वैद्यकीय सेवा मिळूनही, आमदार असूनही वाचवू शकलो नाही. माझ्यासारख्या माणसाची ही स्थिती आहे. पण जनतेला आरोग्य सेवा मिळू शकल्या नाहीत म्हणून अनेकांना जग सोडावे लागले असेल. त्यावेळी एकाने नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची सूचना केली. डॉक्टरप्रमाणेच मदत करणारी नर्ससुद्धा महत्त्वाची आहे. त्यातूनच कोकणातले पहिले नर्सिंग कॉलेज सुरू झाले. १६ वर्षांत दोन हजार कुटुंबातील मुलींना शिक्षण देता आले. या विद्यार्थिनी आज महाराष्ट्रात सेवा बजावत आहेत. आरोग्य सेवेत अडचणी आल्या तरी संकटाचे संधीत रुपांतर करता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. सुदृढ समाज निर्माणासाठी योगदान करत आहोत. श्री. माने यांनी विद्यार्थिनींनाही बहुमोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, तुम्ही आरोग्य क्षेत्रात आला आहात. समाजात आज चांगल्या पगाराची नोकरी म्हणून याकडे पाहिले जाते. पण रुग्णालयात समोर आलेला रुग्ण बरा होऊन घरी गेला पाहिजे. मग घरात जरी काही अडचण असेल तर त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होता कामा नये. डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले की, नर्सिंग कोर्स सुरू होताना लॅंप लायटिंग केले जाते. दिवा हे अंधारातील व्यक्तीला प्रकाश दाखवणारा असतो. नर्स कष्ट, मेहनत घेणारी असते. तिचा रुग्णांशी थेट संपर्क असतो. सहनशील, समजून घेणारी अशी तिची प्रतिमा असते. तिला सेवा द्यायची आहे. फ्लॉरेन्स नाइंटिगेल यांनी रुग्णसेवेचे व्रत स्वीकारले. जागतिक युद्धात जखमी सैनिकांची सेवा त्यांनी केली. सेवा, शुश्रूषा, मानसिक आधारामुळे सैनिक बरे होऊ लागले. कोविड काळात या विद्यार्थिनींनी सेवा दिली आहे. डॉ. ठाकूर यांनी डॉक्टर म्हणून पहिली नोकरी करताना आलेले अनुभव सांगितले. ते म्हणाले, नर्स रुग्णाची काळजी घेत असते. त्यातून डॉक्टर योग्य उपचार करत असतो. कधीही नोकरी पगारासाठी म्हणून करू नका. उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी करताना कामाचे स्वातंत्र्य, शिकण्याची संधी व शिकवणारे असतील तिथे करा. हेच तुमचे भांडवल आहे. मीसुद्धा नर्सिंग कॉलेजमध्ये शिकवत होतो. त्यावेळच्या बॅचच्या विद्यार्थिनी आता मेट्रन म्हणूनही सेवा देत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:04 PM 30-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here