जिल्हास्तरीय औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धेला ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता पीपीटी/नोंदवही पाठवण्याची मुदत ५ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमधील औषधी वनस्पतीबद्दल जागरुकता निर्माण करणे, आपल्या सभोवतालच्या विविध वनस्पतींचे औषधी गुणधर्म शोधणे आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे फायदे याची माहिती संकलित करणे, विद्यार्थ्यांमधील निरीक्षण शक्ती वाढविणे, निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करणे आणि वैज्ञानिक शोधक वृत्ती वाढीस लावणे, रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्लक्षित आणि दुर्मिळ वनस्पतींचे ज्ञान, शोध आणि औषधी गुणधर्म यांची माहिती संकलन व उपयोग जाणून घेणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. स्पर्धा दोन भागात होणार असून पहिला भाग वनस्पतीचे फोटो व त्यांची जास्तीत जास्त औषधी गुणधर्म माहिती संकलित करून पीपीटी बनवणे तसेच ज्या विद्यार्थ्याकडे संगणक उपलब्ध नसेल, त्याने वनस्पतीचे रंगीत फोटो चिकटवून त्या वनस्पतीचे जास्तीत जास्त औषधी गुणधर्म संकलित करणे असे स्पर्धेचे स्वरुप आहे स्पर्धा सहावी ते आठवी, नववी-दहावी आणि अकरावी-बारावी अशा तीन गटांत होणार आहे. तिन्ही गटांसाठी २०००, १५०० आणि १००० रुपयांची पहिली तीन बक्षिसे, तर उत्तेजनार्थ प्रत्येकी ५०० रुपयांची चार बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी एका विद्यार्थ्याने एकाच स्वरूपातील स्पर्धेत सहभाग घ्यावा. नोंदवही व पीपीटी शक्यतो मराठी किंवा हिंदी भाषेत असावी. (नोंदवहीवर स्वतः काढलेली छायाचित्र असावीत), नोंदवही स्वहस्ताक्षरातील किंवा स्वतः काढलेली छायाचित्रे वापरून संगणकीकृत केलेली असावी अथवा प्रत्यक्ष झाडाचे पान, फूल लावावे. स्पर्धेचा कालावधी ११ ऑक्टोबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ असा आहे. या कालावधीत आपण माहिती गोळा करणे, सर्वेक्षण करणे त्यांचे उपयोग, आयुर्वेदिक स्थान यासंबंधी माहिती गोळा करणे, आपल्या भागात उपलब्ध असलेल्या वनस्पतींची माहिती फोटोसह देणे अपेक्षित आहे. परीक्षक स्वतः येऊनही परीक्षण क्षेत्राची पाहणी करू शकतील. आपली पीपीटी, नोंदवही ५ डिसेंबरपर्यंत संपदा धोपटकर, जेएसडब्ल्यू एनर्जी लि., सीएसआर ऑफिस, मु. कुणबीवाडी नांदिव, पो. जयगड ता. जि. रत्नागिरी -४१५६१४ या पत्त्यावर पोहोचेल याची काळजी घ्यावी. स्पर्धेत ज्या शाळेतील जास्त विद्यार्थी सहभागी होतील अशा शाळांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने गौरविण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव, शाळेचे नाव, इयत्ता, मोबाइल क्रमांक, घरचा पूर्ण पत्ता, पिनकोड असा तपशील द्यावा. तज्ज्ञ परीक्षकांकडून स्पर्धेचे परीक्षण करून निकाल जाहीर केला जाईल. अधिक माहितीसाठी रवींद्र इनामदार (९४२२३८२०८४) किंवा प्रभाकर सनगरे (९४२३०५००२९, ८२७५९१३९२३) यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, विज्ञान शिक्षक मंडळाचे पदाधिकारी आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशनने केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:29 PM 30-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here