मुसळधार पावसाने महाड परिसरात पुर स्थिती

0

महाड : मागील आठवड्यापासून महाड शहर व ग्रामीण  भागातील अपवादात्मक काही काळ वगळता इतर ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. महाड शहर परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असणाऱ्या पावसामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशीच संपूर्ण तालुक्याचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. महाड शहरानजीक वाहणाऱ्या सावित्री, गांधारी, काळ-काळ नद्या दुथडी भरून वाहत असून शहरातील विविध सखल भागांमध्ये पुरसदृष्य स्थिती  निर्माण झाली आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून आगामी चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस  होण्याचा इशारा नागरिकांना दिला असून अत्यावश्यक गरजा असतील तरच घराबाहेर पडावे असे  स्पष्ट केले आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून महाड तालुक्यात विविध भागांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टीने आवशक्य असणारा कोटा जवळपास पूर्ण केला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत सुमारे दोन हजार सहाशे मिलिमीटर एवढा पावसाची नोंद करण्यात आली होती. तर आतापर्यंत सुमारे दोन हजार शंभर मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाड पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात होणाऱ्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागातून शहरांमध्ये दैनंदिन कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर पूर्ण परिणाम झाल्याचे दिसून येत असून महाड शहरातील बाजारपेठमधे लोकांची कमी संख्या दिसून येत आहे .गेल्या चोवीस तासांत पडत असणाऱ्या पावसाचा परिणाम विविध क्षेत्रातील व्यापारीवर्गावर होत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. जर श्रावण महिन्यात शेतीसाठी अत्यावश्यक असणारी थोडी उघडीप न मिळाल्यास शेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे .मागील चोवीस तासात आपत्ती निवारण कक्षातून तालुक्यातील कोणत्याही ठिकाणी नुकसानीची घटना घडली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना तसेच सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना दक्ष व सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती नायब तहसिलदार कुडळ यानी दिली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here