सिंधुदुर्गात वैभववाडी ठरला पहिला कोरोनामुक्त तालुका

0

सिंधुदुर्ग : एकीकडे कोरोनाच्या नव्या ओमिक्रोन व्हेरीएंंटचं संकट घोंगावत असताना दुसरीकडे सिंधुदुर्गवासियांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. कारण, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बुधवारचा कोरोना रिपोर्ट झिरो आहे. सगळ्याच तालुक्यात कोरोनाची बुधवारची आकडेवारी शून्य आहे. तर वैभववाडी हा जिल्ह्यातील कोरोनामुक्त होणारा पहिला तालुका ठरला आहे. गेल्या दोन महिन्यापासून सिंधुदुर्गातील कोरोनाच्या आकडेवारीत झपाट्याने घट होताना पाहायला मिळाली आहे. सध्या सिंधुदुर्गात कोरोनाचे केवळ ४७ रुग्ण सक्रिय आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. मार्च महिन्यापासून कोरोनाने अक्षरशः थैमान घातले होते. कोरोनामुळे मृत्यू आणि बाधितांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. बेड, व्हेंटिलेटर यांचा तुडवडा निर्माण झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. त्यातच सक्रीय रुग्णांची संख्या ६ हजारांच्या घरात पोहचली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खबरदारी म्हणून कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून हळूहळू परिस्थिती नियंत्रणात यायला लागली. जिल्ह्यातली दुसरी कोरोनाची लाट ओसरू लागली. त्यानंतर मात्र कोरोनाच्या आकडेवारीत घट होण्यात सातत्य दिसून आले. तब्बल ७ महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या सक्रीय रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. आता तर कोरोनाचे केवळ ४७ रुग्ण सक्रीय आहेत. दरम्यान बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात काल एकाला डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५१ हजार ६८३ झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५३ हजार १८८ वर बुधवारी स्थिर राहिली आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आता पन्नासच्याही खाली म्हणजे ४७ पर्यंत खाली आली आहे. कोव्हीड-१९ मुळे बुधवारी एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ४५८ आहे,
गेल्या आठवड्यापासून वैभववाडी तालुक्यात एकही नव्या कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही. त्यामुळे वैभववाडी हा कोरोनामुक्त होणारा पहिला तालुका ठरला आहे. पहिल्या लाटेतही वैभववाडी तालुक्यानेच हा विक्रम केला होता. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला वैभववाडी तालुक्यातील ३ गावेच कोरोनाची हॉटस्पॉट ठरली होती. मात्र, त्यानंतर आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली आणि ग्रामस्थांच्या मदतीने कोरोनामुक्त होण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. एकंदरीत, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रशासनाची मेहनत आणि सिंधुदुर्गवासियांचा संयम यामुळे सध्या तरी कोरोनाबाबत दिलासादायक स्थिती आहे. मात्र, आताच ओमिक्रोनचं संकट पाहता पुन्हा एकदा सगळ्यांचीच कसोटी लागणार आहे. लसीकरण, कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले तरच सिंधुदुर्ग कोरोनाविरोधातील एक मोठी लढाई लवकरच जिंकू शकतो.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:41 AM 02-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here