मिरजोळीत बांधकाम व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला टाकला मैला; परिसरात दुर्गंधी

0

चिपळूण : शहरालगतच्या मिरजोळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. येथील काही बांधकाम व्यावसायिकांकडून रस्त्याच्या कडेला मैला टाकला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मिरजोळी साखरवाडी येथील बांधकाम व्यावसायिकाने आपल्या इमारतीच्या मुख्य टाक्यांमधून पाईपलाईनने पंपाच्या माध्यमातून मैला थेट रस्त्याच्या कडेला खड्डा मारून त्यात टाकला आहे. या खड्डयावर प्लास्टिक टाकण्यात आले असून दुर्गंधीमुळे हा प्रकार उघडकीस आला. या विरोधात ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आली आहे. मिरजोळी शहरालगत असल्याने या भागात अनेक टोलेजंग इमारती निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये सदनिकाधारक वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे मिरजोळीची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, काही बांधकाम व्यावसायिकांनी मिरजोळीमध्ये शासकीय नियमांचे उल्लंघन केले असून आता ग्रा.पं.साठी ही डोकेदुखी ठरत आहे.
मिरजोळी ग्रा.पं. हद्दीत कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच एका बांधकाम व्यावसायिकाने मैला रस्त्याच्या कडेला टाकल्याने ग्रामस्थांना त्याचा त्रास होत आहे. मिरजोळीमध्ये अनेकांची घरे, इमारती वाशिष्ठी नदीपात्रालगत आहेत. अनेकांनी अनधिकृतपणे इमारती उभ्या केल्या असून शौचालयाचे पाईप थेट वाशिष्ठी नदीत सोडण्यात आले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी मिरजोळीमध्ये नियम धाब्यावर बसविले असून याकडे प्रशासनाचा कानाडोळा होत आहे.
याची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत असून याबाबत उपसरपंच गणेश निवाते यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कडक कारवाई करणार असे सांगितले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:30 PM 02-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here