पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री घेणार सोनियांची भेट

0

 

भाजपाशी काडीमोड घेत मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आज मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार असून ते काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेणार आहेत. दुपारी 12 वाजता ठाकरे दिल्लीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटणार आहेत. राजकीय वर्तुळाचं लक्ष या बैठकीकडे लागून राहिलं आहे. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यातल्या भेटीत वादग्रस्त राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी म्हणजेच एनपीआर बाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. एनपीआरची अंमलबजावणी देशहिताची असल्याचं सांगत, राज्यात एक मे पासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शिवसेना अनुकूल आहे. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मात्र त्याच्या ठाम विरोधात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात एनपीआर लागू करण्याचा निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन, या भेटीत सोनिया गांधींकडून उद्धव ठाकरेंना केलं जाण्याची शक्यता आहे. विविध राज्यांतल्या भाजपेतर सरकारांनी एनपीआर बाबत घेतलेली विरोधाची भूमिका, महाराष्ट्रातही महाविकास आघाडीनंही घ्यावी अशी काँग्रेस तसंच राष्ट्रवादीचीही उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा आहे.तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची मोदींशी ही दुसरी भेट आहे. याआधी पुण्यात पंतप्रधान आले असताना दोघांची विमानतळावर भेट झाली होती. पण ती फक्त काही मिनिटांपुरतीच होती. आता दोघांची सविस्तर भेट होणार आहे. यावेळी राज्याला मिळणाऱा निधी आणि महापूरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या मदतीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here