‘महाराष्ट्रात उर्दूची सद्यःस्थिती आणि समीक्षा’ या विषयावरचे राष्ट्रीय चर्चासत्र रत्नागिरीत येत्या शनिवारी (दि. २२ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आले आहे. येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय उर्दू भाषा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र होणार आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन अध्यक्षपद भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ‘खतीबे कोकण’ अली एम. शमसी (मुंबई) आणि श्रीमती मेमुना अली चौगुले (कुवेत) उपस्थित राहणार आहेत. चर्चासत्राचे बीजभाषण प्रसिद्ध उर्दू कवी, पत्रकार आणि समीक्षक शमीम तारिक करतील. चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मोहम्मद दानिश गनी यांच्या ‘शेर के पर्दे में’ या समीक्षात्मक पुस्तकाचे प्रकाशन ‘खतीबे कोकण’ अली एम. शम्सी यांच्या हस्ते होईल. पुस्तकावर होणाऱ्या चर्चेत शमीम तारीक, तसनीम अन्सारी, रफीक जाफर, डॉ. गजनफर इकबाल, खान हसनेन आकीब, प्रा. सलिम मोहिद्दीन, माजीद काजी सहभागी होतील.चर्चासत्रात शोधनिबंधांचे वाचन केले जाणार आहे. त्यामध्ये अब्द्त रहिम बश्तर (नागपूर), रफीक जाफर (पुणे), प्रा. सलिम मोहिद्दीन (परभणी), डॉ. शफी अय्युब (जे.एन.यू., नवी दिल्ली), डॉ. अफाक आलम सिद्दिकी (शिमोगा), खान हसनेन आकीब (पुसद), डॉ. गजनफर इकबाल (गुलबर्गा), डॉ. माजिद काजी (मुंबई), डॉ. अब्दुल बारी (पुणे), डॉ. तय्यब खयदी (चेन्नई), डॉ. नियर अहमद (बलगावी), परवेज अहमद कामठी (नागपूर), डॉ. अब्दुल रहिम ए मुल्ला (बिजापूर), डॉ. सोफिया बानो ए शेख (अहमदाबाद) इत्यादी अभ्यासक आपले शोधनिबंध सादर करतील. यावेळी ‘रायगडचा आवाज’चे संपादक मोहम्मद शफी पोरकर, ए. आर. डी. खतीब, सईद कावल, तसबिक अन्सारी, लाईक फोंडू, मन्सूर काजी, साजिदा बिजापुरी, अलीमिया काजी, अब्दुल हमीद होडेकर, डॉ. सिराज मोमीन हे मान्यवर उपस्थित असणार आहेत. चर्चासत्राला रत्नागिरीतील उर्दू अभ्यासक, जाणकारांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.
