करसल्लागारांनी दर्जेदार सेवा आणि ज्ञान द्यावे : एम. श्रीनिवास राव

0

रत्नागिरी : रत्नागिरीतील करसल्लागारांनी ग्राहकांना दर्जेदार सेवा आणि ज्ञान द्यावे, असे आवाहन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सचे अध्यक्ष एम. श्रीनिवास राव यांनी केले. रत्नागिरी जिल्हा करसल्लागार असोसिएशनतर्फे येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात आयोजित एक दिवसाच्या कार्यशाळेत ते बोलत होते. श्री. राव म्हणाले, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सतर्फे देशात सर्वत्र कार्यक्रम सुरू आहेत. रत्नागिरी ही रत्नांची खाण आहे. कोकणातील भारतरत्नांचे देशाच्या विकासात योगदान आहे. त्याचप्रकारे रत्नागिरीतील करसल्लागारांनी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्समध्ये सहभाग घ्यावा. फेडरेशन व्यावसायिक तत्त्व पाळते, दर्जेदार सेवा आणि ज्ञान देण्याचे काम करते. तेच काम करसल्लागारांनी पुढे न्यावे. करोना महामारीच्या काळात ऑनलाइन कार्यक्रम घेतले. मुटकोर्ट स्पर्धा, विविध कार्यक्रम आयोजित केले. मध्य प्रदेश, लखनौ येथेही आता कार्यक्रम होणार आहे. सी. ए. मेहता म्हणाले, ज्ञान हे सर्वांत शक्तिशाली आहे. कार्यशाळेतून काही फायदे मिळतील. रत्नागिरी जिल्हा पातळीवर चांगल्या कामामुळेच आपल्याला अॅप्रिसिएशन अॅवॉर्ड मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. संघटनेला ७० वर्षे झाली आहेत. श्रोत्यांमध्ये असलेल्यांनी आता बोलायला पुढे यावे. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. आपल्या समस्यांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, आयुक्त गुप्ता यांचीही भेट घेतली. त्यांनी टॅक्ससंदर्भातील समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवरील आपली समस्या मांडाव्यात. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. कार्यशाळेसाठी जीएसटीपीएमचे उपाध्यक्ष सुनील खुशलानी, सचिव प्रवीण शिंदे, कार्यकारिणी सदस्य विनोद म्हस्के, सिंधुदुर्ग जिल्हा करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सी. ए. सागर तेली यांच्यासमवेत दोन्ही जिल्ह्यातील संघटनेचे सदस्य उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरवात झाली. प्रास्ताविकामध्ये अॅड. बेर्डे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. असा मोठा कार्यक्रम रत्नागिरीत प्रथमच होत असल्याबद्दल फेडरेशनचे आभार मानले. जास्तीत जास्त सदस्यांनी फेडरेशनचे सदस्य व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सी. ए. केदार करंबेळकर यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सन्मानही ऑल इंडिया फेडरेशनतर्फे श्री. राव यांनी केला. उद्घाटनानंतर दिवसभरात विविध विषयांवर मार्गदर्शक व्याख्याने झाली. सी. ए. संजय वनभट्टे, जनक वाघानी, सी. ए. उन्मेष पटवर्धन यांनी व्याख्याने दिली. तसेच उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:27 PM 06-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here