राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता दिसत आहे. यातील दोन जागांवर उदयनराजे भोसले आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित झालं असून तिसऱ्या नावावर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांना उदयनराजेंची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा असल्याचे विचारल्यावर काकडे यांनी उदयनराजेंचे भाजपसाठी काय योगदान आहे, असा सवाल उपस्थित केला. त्यांच्यापेक्षा मी पक्षाच्या वाढीसाठी जास्त प्रयत्न केले आहेत,’ असे काकडे म्हणाले. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांचा भाजपच्या तिकिटावर काही दिवसांपूर्वीच पराभव झाला होता. त्यांचे पुनर्वसन करण्याचा विचार राज्यातील भाजप नेतृत्व करत असून त्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु आहे. आता त्यावर भाजपच्या सहयोगी खासदारानेच टीका करत घराचा आहेर दिला आहे. यावेळी काकडे म्हणाले की, ‘उदयनराजे फक्त भोसले आहेत म्हणून सरस होऊ शकत नाहीत. भारतातला मी एकमेव असा माणूस आहे की अपक्ष असतानाही निवडून आलो. ते छत्रपतीचे वंशज असले तरी आम्हीही महाराजांच्या सरदारांचे वंशज होतो असेही ते म्हणाले.पुढे म्हणाले की, ‘मी स्वतः भारतीय जनता पक्षाचे दीड लाख सभासद नोंदवले आहेत. 2019 ची लोकसभा असो अथवा विधानसभा असो, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेश मी पाळले.त्यामुळे राज्यसभा मलाच मिळेल मला फडणवीस डावलतील असं वाटतं नाही, डावलल्यावर बघू. परंतु माझ्यासाठी तेच मोदी आणि शहा आहेत असे असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
