रिफायनरी प्रकल्पाला समर्थन दिल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली. अशा नाराज कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात यावे, असे आवाहन भाजपचे राजापूर तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केले आहे. सागवे (ता. राजापूर) परिसरातील शिवसेनेच्या २२ पदाधिकाऱ्यांनी कालच राजीनामे दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर श्री. गुरव यांनी हे आवाहन केले आहे. कोकण विकासासाठी रिफायनरी प्रकल्पाची आवश्यकता असून भारतीय जनता पक्ष त्यासाठी नेहमीच आग्रही राहिला आहे. आता या रिफायनरीचे महत्त्व पटल्यामुळे राजापूर तालुक्याच्या सागवे आणि त्या भागातील काही शिवसैनिक व पदाधिकारी या रिफायनरीसाठी आग्रही राहिले आहेत. मात्र शिवसेनेकडून अशा पदाधिकार्यांवर कारवाई करून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येत आहे. विकासासाठी उभे राहिलेल्या या अशा पदाधिकार्यांचे आम्ही भाजपमध्ये स्वागत करू, असे श्री. गुरव यांनी म्हटले आहे.
