चिपळूण (प्रतिनिधी) : विवाहितेवर खुनी हल्लाप्रकरणी एकाविरोधात तर हल्लेखोराला मारहाणप्रकरणी नऊजणांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली होती. याबाबतची फिर्याद प्राजक्ता नितीन बद्रि (३२, रा. पेठमाप गणेशवाडी) हिने दिली आहे. यानुसार प्राजक्ता या घरकामासाठी दुसरीकडे जात असताना नितीन तांबिटकर याने ती मोबाईलवर समक्ष बोलत नसल्याचा राग मनात धरून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये ती जखमी झाली असून तिच्यावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार नितीन तुकाराम तांबिटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरी फिर्याद नितीन तांबिटकर याने दिली आहे. त्यानुसार नितीन बांद्रे, नवनीत बुरटे, रहिम कास्कर, जाहिद चिकटे यांच्यासह नऊजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या नऊजणांनी आपल्याला मारहाण केली अशी फिर्याद दिली आहे. या मारहाणीत नितीनच्या तोंडाला व डोक्याला दुखापत झाली असून त्याच्यावर लाईफकेअरमध्ये उपचार सुरू आहेत.
