५७ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा : पुण्याने पटकावला दुहेरी मुकुट

0

सोलापूर : महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर अम्याचूर खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने ५७ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा वेळापूर (ता. माळशिरस), सोलापूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत पुण्याने दुहेरी मुकुट मिळवला. या पूर्वी १९९५-९६ साली कुळगाव ठाणे येथे झालेल्या ३४ व्या पुरुष- महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुण्याने दुहेरी मुकुट मिळवला होता. पुरुष- महिला गटात दुहेरी मुकुट सहजासहजी कोणाला मिळत नाही ही गोष्ट येथे अधोरेखित होते. या स्पर्धेतील सर्वोत्कष्ट अष्टपैलू खेळाडूसाठी असलेली राणी अहिल्या पुरस्काराची मानकरी प्रियांका इंगळे ठरली तर पुरुष गटातील राजे संभाजी पुरस्काराचा मान प्रतीक वाईकर याने मिळविला. या स्पर्धेतील तृतीय स्थान महिला गटात उस्मानाबाद आणि पुरुष गटात सांगलीने संपादन केले. महिलांच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या पुण्याने ठाण्यावर १३-१२ असा ३.४० मिनिटे राखून विजय मिळविताना विशेष प्रयास करावे लागले नाहीत. प्रियांका इंगळे (२:००, १:४० मि. संरक्षण व ५ बळी), दिपाली राठोड (२:१०, १:०० मि. संरक्षण व २ बळी) व श्वेता वाघ (१:५०, १:५०) यांच्या शानदार खेळीमुळे पुण्याने मध्यंतरास ९-५ अशी आघाडी घेतली होती. ठाण्याच्या रेश्मा राठोड (१:५० मि. संरक्षण व ४ बळी), मृणाल कांबळे (४ बळी) व कविता घाणेकर (२:२० मि. संरक्षण) यांची खेळी अपुरी पडली. पुरुषांच्या अंतिम सामन्यात पुण्याने गतविजेत्या मुंबई उपनगरला १७-१६ असे एका गुणाने नमविले. ह्या सामान्यतील चुरस इतकी टोकाची होती की शेवटच्या क्षणापर्यंत खेळाडूंनी केलेल्या खेळींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मध्यंतरापर्यंत ८-८ अशी बरोबरी झाल्यानंतर निर्णायक आक्रमणात मुंबई उपनगरचा गुण मिळविण्याचा तर पुणे संरक्षणात बचाव करण्याचा प्रयत्न करीत होता तर सर्व प्रेक्षकांचे लक्ष सामना संपल्याची पंचाची शिट्टी कधी वाजते याकडे होते. अखेर शेवटच्या मिनिटात पुण्याने बचाव करीत बाजी मारली. पुण्याच्या मिलिंद करपे ( १:०० मि. संरक्षण व ५ गडी), प्रतीक वाईकर (१:४० मि. संरक्षण व ३ गडी) व सागर लेंग्रे (१:४० मि. संरक्षण व १ गडी) यांची अष्टपैलू खेळी संघाच्या विजयात महत्वपूर्ण ठरली. मुंबई उपनगरच्या अक्षय भोंगरे (१:१०, १:०० मि. संरक्षण व ५ गडी), अनिकेत पोरे (१:३०, १:०० मि. संरक्षण व २ गडी), ऋषिकेश मुरचावडे (१:३०, १:१० मि. संरक्षण व १ गडी) याची अष्टपैलू लढत अपुरी पडली. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात लघुत्तम आक्रमणाच्या डावात महिला गटात उस्मानाबादने रत्नागिरी वर २३ सेकंदाने तर पुरुष गटात सांगलीने ठाणेवर ११ सेकंदाने मात केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:16 PM 14-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here