मनसेला पुण्यात मोठं खिंडार; रुपाली पाटील यांनी दिला राजीनामा

0

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपला सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान नव्या पक्षातील प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसात त्या घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे बुधवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. परंतु त्याआधीच रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याने राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून त्यांना ऑफर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे. तसेच आपले आशीर्वाद आणि “श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल’ अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.
राजीनामा देण्याआधी रुपाली या युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची सह्याद्री अतिथिगृहात भेट घेऊन चर्चा केल्याने त्या शिवसेनेत जाणार, याची चर्चा रंगली आहे. सरदेसाई यांच्या आधी रुपाली पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटल्या आणि राष्ट्रवादीतील प्रवेशाचा मुहूर्तही ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रुपाली या आपल्या मनगटावर घड्याळ की शिवबंधन याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मूळ वकील असलेल्या रुपाली या मनसेच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १४ वर्षापासून राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. या काळात महापालिकेच्या २०१२ निवडणुकीत त्या मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाल्या. त्यानंतरच्या २०१७ च्या निवडणुकांत त्यांचा पराभव झाला तरीही त्या राजकारणात सक्रिया राहिल्या आणि विधानसभेच्या २०१९ निवडणुकीत त्या कसबा मतदारसंघातून मनसेकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:22 AM 15-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here