रत्नागिरी : महावितरणच्या बिलांमध्ये अंदाजे रिडिंग घेऊन ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी महावितरणकडे येत आहेत. बिलांमधील सावळागोंधळ पाहून अनेकांनी महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणच्या पाली उपकेंद्राच्या अखत्यारितील नाणीज, कशेळी, साठरे, पाली बाजारपेठ, वळके, कापडगाव अनेक गावांमध्ये ज्या कंत्राटी पद्धतीने सेवा पुरविल्या जातात, त्यांचा पुरता गोंधळ उडालेला आहे. त्यामध्ये ऑनलाईन तक्रारींची दखल न घेणे, मीटर रिडींग न घेणे, बंद असलेल्या अनेक मीटरचे अंदाजे बिल देणे, विज देयके देय दिनांकामध्ये ग्राहकांना वितरीत न करणे यासारख्या सेवांच्या गोंधळामुळे वीज ग्राहकांना याचा फटका बसत आहे.
