पिरंदवणे येथील मंदिरात दानपेटी फोडून पैसे लांबवण्याच्या प्रयत्नात असलेला चोरटा अटकेत

0

संगमेश्वर : तालुक्यातील पुरातन मंदिरे फोडून दानपेटी, मौल्यवान दागिने आणि मुर्त्या लंपास करणाऱ्या चोरट्यामुळे पोलीस त्रस्त झाले होते. पिरंदवणे येथील मंदिरात बुधवारी सकाळी दानपेटी फोडून पैसे लांबवण्याचा प्रयत्नात असलेल्या चोरट्याला संगमेश्वर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करून पकडले आहे. पिरंदवणे येथील श्रीदेव महालक्ष्मी मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याचे त्याने कबूल केले आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील पुरातन मंदिरातील चोऱ्यांचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. या चोरट्याचे नाव सुभाष पांडुरंग कदम (वय 62) असल्याची माहिती संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांनी दिली. संगमेश्वर तालुक्यामध्ये चालुक्य राजवटीसह अनेक पुरातन मंदिरे आहेत. मंदिरांमध्ये पुरातन मूर्त्या आहेत. अनेक मंदिरे चोरट्याने फोडली होती, परंतु चोरटा सापडत नव्हता. त्यामुळे चोरट्याचा पोलीस शोध घेत होते. 10 डिसेंबर रोजी पिरंदवणे येथील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराचा दरवाजा कटावणीच्या साहाय्याने फोडून दानपेटीतील पैसे चोरण्याचा प्रयत्न चोरट्याने केला होता. यावेळी मंदिरामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा चोरटा दिसला होता. मंगळवारी रात्री डिंगणी पोलीस दूर क्षेत्राचे बीट अंमलदार संतोष झापडेकर हे आपल्या सहकाऱ्यांबरोबर संगमेश्वर येथे रात्री गस्त घालत असताना त्यांना असुर्डे येथे रस्त्यावर एक मनुष्य संशयास्पदरित्या फिरतांना दिसला. त्याचा चेहरा सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीसारखा दिसत होता. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस त्याच्याजवळ गेले असता त्याने लगेच शेतामध्ये उडी टाकून पलायन केले. ही माहिती पोलीस निरीक्षक उदय झावरे यांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी गावकऱ्यांना ही माहिती देत रिक्षाचालक आणि ग्रामस्थांनी पलायन करणाऱ्यावर पाळत ठेवली. बुधवारी सकाळी संगमेश्वर बसस्थानकामध्ये मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती फिरत होती. यासंदर्भात ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस संतोष झापडेकर , सचिन कामेरकर तसेच ग्रामस्थ निखिल लोध, भाया सुर्वे, संकेत गुरव, विश्वास गुरव, कल्पेश गुरव, पोलीस पाटील सुभाष गुरव आदी ग्रामस्थांच्या मदतीने चोरट्याला पकडण्यात यश आले आहे. मंदिर फोडणारा चोरटा जेरबंद झाल्याने संगमेश्‍वर तालुक्‍यातील अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. सुभाष पांडुरंग गुरव या संशयीत चोरट्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:30 PM 16-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here