रत्नागिरी बसस्थानक लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी

0

रत्नागिरी : रत्नागिरीत तीन वेळा भूमिपूजन झालेले आणि तीन वर्षे रखडलेले मध्यवर्ती एसटी बसस्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. रत्नागिरी पालिकेची नळपाणी योजना पाच वर्षे सुरू आहे, तीही पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी व्यक्त केली असून कामे अपूर्ण ठेवणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले, अपूर्ण कामे कधी पूर्ण होणार, असा सवाल सामान्य रत्नागिरीकरांच्या मनात आहे. जिल्हा रुग्णालयातील गोंधळाचाच कारभार, जिल्हा परिषदेतील रिक्त पदे याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पायाभूत सुविधांची वानवा आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये फक्त घोषणा होतात, भूमिपूजने होत आहेत, प्रत्यक्षात विकासकामे पूर्ण होत नाहीत, ही रत्नागिरीकरांची खंत आहे. रत्नागिरीत सातमजली भव्य प्रशासकीय इमारत होणार, अशी घोषणा दोन दिवसांपूर्वी करण्यात आली. त्याकरिता निधीही दिला. निश्चित ही बातमी रत्नागिरीकरांसाठी चांगली आहे. परंतु रखडलेली कामे कधी पूर्ण होणार, हा प्रश्न आहे. अनेक योजनांमध्ये गोलमाल असल्याचे अनेकदा नागरिकांनीच उघडकीस आले आहे. एसटी बसस्थानक अपूर्ण असून त्यासमोरील थांब्यावर अजून निवारा शेड बांधलेली नाही. मंत्रिमहोदयांनी नगरसेवकांना याबाबत सूचना दिली होती. परंतु ती का पूर्ण झाली नाही, याचे उत्तर ते विचारत नाहीत. रखडलेल्या विकासकामांबाबत न बोलता फक्त प्रशासकीय इमारतीच्या घोषणा होत आहेत. मांडवी पर्यटन, बंद सौरदिवे, मिरकरवाडा जेटीचे काम अपूर्ण, मिऱ्या बंदरचे बंधारा काम अपूर्ण आहे. व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, आंबा बागायतदार, महावितरणच्या बिलांबाबत जनतेत नाराजी आहे. नवीन डांबरीकरणाच्या घोषणा करण्यापलीकडे विकास काही जात नाही. याकरिता मंत्रिमहोदयांनी दर आठवड्याला आढावा बैठक घ्यावी. परंतु ते दौऱ्यावर येतात, रस्त्यांची उद्घाटने करतात आणि स्थानिक आमदार निधीतून कामांचे नारळ फोडतात. परंतु डांबर, विकास यापलीकडे काम झालेले नाही, अशी खिल्ली पटवर्धन यांनी उडवली. मंत्रिमहोदय चिपळूणच्या वाशिष्ठीला पाहिजे तेवढा निधी देणार आहेत. परंतु रत्नागिरी एसटी बसस्थानकाचे तीन वेळा भूमिपूजन झाले त्याची आज काय अवस्था आहे, हे त्यांनी पाहिले नाही रत्नागिरी मतदारसंघातही विकासकामे रखडली आहेत. त्याकडे लक्ष द्यावे, अशीही अपेक्षा अनिकेत पटवर्धन यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:39 PM 16-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here