कोल्हापूरच्या लीना नायर यांचा परदेशात डंका, फ्रान्सच्या बड्या कंपनीचे करणार नेतृत्व

0

जगभरातील बडय़ा कंपन्यांची धुरा हिंदुस्थानींच्या हाती येऊ लागली आहे. ट्विटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल यांची काही दिवसांपूर्वी नियुक्ती झाली. त्यानंतर आता जगप्रसिद्ध लक्झरी ब्रॅण्ड ‘शनॅल’च्या ग्लोबल चीफ एक्झिक्युटिव्ह पदावर हिंदुस्थानी वंशाच्या लीना नायर यांची निवड झाली आहे. लीना नायर या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. त्या 2013 मध्ये लंडनला स्थायिक झाल्या. लीना नायर नव्या वर्षात म्हणजे जानेवारी 2022 पासून ‘शनॅल’ ग्रुपमध्ये सामील होणार आहेत. नायर यांची ग्लोबल कन्झ्युमर गुड्स कंपनीत जवळपास 30 वर्षांची कारकीर्द आहे. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूरच्या होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून झालेय. सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी इलेक्ट्रिकली इंजिनीयरिंगची पदवी घेतली आहे. तसेच जमशेदपूरच्या सेंट झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. नायर यांनी करीयरची सुरुवात युनिलिव्हर कंपनीपासून केली. 2016 मध्ये त्या युनिलिव्हरच्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण सीएचआरओ बनल्या. आता त्यांनी या कंपनीतून राजीनामा दिला आहे. शनॅल हे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड आपले ट्वीड सूट, क्विल्टेड हॅण्डबॅग आणि No. 5 परफ्युमसाठी ओळखले जाते. लीना यांनी गेल्या तीन दशकांमध्ये कंपनीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यासाठी मी त्यांचे आभार मानू इच्छितो, अशी प्रतिक्रिया युनिलिव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन जोप यांनी दिली. शनॅलमध्ये सीईओ म्हणून काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. शनॅल ही नामांकित कंपनी आहे. मी युनिलिव्हरमध्ये काम केले याचा मला नेहमीच अभिमान वाटेल. युनिलिव्हरकडून मला खूप प्रेम आणि आदर मिळाला आहे. मला शुभेच्छा देणाऱया सर्वांचे आभार. – लीना नायर

लीना नायर यांनी त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळात अनेक एचआर इंटरवेन्शन केले. त्यापैकी ‘करीअर बाय चॉइस’ हा उपक्रम सर्वाधिक कौतुकास्पद ठरला. महिलांसाठी हा उपक्रम होता. ज्या महिलांनी आपले करीअर मागे सोडले आहे त्यांना वर्कफोर्समध्ये आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. गेल्या महिन्यात फॉर्च्युन इंडियाने मोस्ट पॉवरफुल वुमेनच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट केले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:24 PM 16-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here