प्रभानवल्ली येथे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सातवे ग्रामीण साहित्य संमेलन

0

रत्नागिरी : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे सातवे ग्रामीण साहित्य संमेलन येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रभानवल्ली (ता. लांजा) या ऐतिहासिक गावी होणार आहे. कवी अशोक लोटणकर यांच्या अध्यक्षतेखाली हे तीन दिवसांचे संमेलन होईल. नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी लांजा येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राजापूर आणि लांजा तालुक्यातील मुंबईत राहणाऱ्या ग्रामस्थांनी स्थापन केलेली ‘राजापूर लांजा तालुका नागरिक संघ’ ही संस्था गेली सदुसष्ट वर्षे कार्यरत आहे. या परिसरातील जनतेच्या समस्या सोडविणे, सुविधांची शासनाकडे मागणी करणे यांसारख्या कामांबरोबरच संघाने करोनाच्या काळात अनेक प्रकारे मदतकार्य केले. ग्रामीण जनतेच्या मनातील विविध प्रकारचे विचार, भावना आणि अपेक्षा व्यक्त करण्याचे एक व्यासपीठ या संस्थेने ग्रामीण साहित्य संमेलनाच्या रूपाने उभारले आहे, फेब्रुवारी महिन्यात होणारे संमेलन सातवे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आनंदराज आंबेडकर संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. श्री. लाड म्हणाले, २०१५ साली या संस्थेचे पहिले साहित्य संमेलन तळवडे येथे झाले, ते पहिले संमेलन असूनही ते बऱ्याच अनुभवांनी सिद्ध झालेले संमेलन होते, असे वाटण्याइतपत ते यशस्वी झाले. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर त्याचे अध्यक्ष होते. ग्रामीण भागातील लोकांना, शेतकऱ्यांना त्यांचे विचार मांडण्याची संधी देण्याच्या विचारातून साहित्य संमेलनाची कल्पना जन्मली. प्रभानवल्ली येथील संमेलनाच्या निमित्ताने ही साहित्यिक सप्तपदी पूर्ण होत आहे. फेब्रुवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात ४, ५ आणि ६ या तारखांना हे संमेलन होईल. ४ तारखेला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या कोट या गावातून क्रांतीज्योतीची मिरवणूक सुरू होईल. रात्री ‘आक्रन्दन’ हे स्थानिक कलाकारांचे नाटक होईल. ५ तारखेला पारंपरिक वेशभूषा धारण केलेल्या कार्यकर्त्यांसह साहित्य दिंडी निघेल. कुडाळ येथील पालकर नावाच्या मुलीने साकारलेले ‘दगड शिल्प’ हे विशेष आकर्षण असेल. या संमेलनास येणाऱ्या मुख्य वक्त्यांमध्ये इतिहासाचे अभ्यासक भगवान चिले, कवी प्रसाद कुलकर्णी यांचा समावेश असेल. मुलांचे कविता सादरीकरण, नृत्य इत्यादी कार्यक्रम होतील. तिसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येईल. या तेवीस पुरस्कारांमध्ये काबाडकष्ट करून मुलांचे संगोपन करून त्यांना घडविणाऱ्या महिलेला दिला जाणारा पुरस्कार, वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्त्याला दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार हे लक्षवेधी आहेत. मुंबईकर नवरा मिळविण्याच्या आग्रहापोटी अनेक मुलांचे विवाह रखडतात. अशा स्थितीत गावातच राहणाऱ्या मुलांबरोबर विवाह करणाऱ्या मुलींचा त्यांच्या पतीसमवेत सत्कार करण्यात येईल. मुलुंड येथील मराठा मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडेल. ग्रामीण बोलीतील उखाणे या विषयावर ‘मुंबई दूरदर्शन’च्या निवेदिका दीपाली केळकर यांचे व्याख्यान होईल. कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या या संमेलनाला साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुभाष लाड यांनी केले. पत्रकार परिषदेला जयप्रकाश सावंत, अनंत शिंदे, लांजा ग्रामीण शाखेचे महेंद्र साळवी, विजय हटकर आणि संघाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:49 PM 16-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here