रामदास कदम मुंबईच्या दिशेने रवाना; पत्रकार परिषदेत करणार मोठा खुलासा

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत ‘साईडलाईन’ झालेले कोकणातील नेते आणि माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ते शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेणार असून यावेळी त्यांच्याकडून मोठा खुलासा केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यासाठी रामदास कदम काही वेळापूर्वीच खेडहून मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहेत. त्यामुळे आता रामदास कदम उद्या मुंबईत एखादी मोठी घोषणा किंवा राजकीय बॉम्ब टाकणार का, याकडे राजकीय वर्तुळासह साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्यादृष्टीने शिवसेनेकडून नुकताच खांदेपालट करण्यात आला होता. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना हटवून त्याजागी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे. मात्र, याठिकाणी रामदास कदम यांचे काही समर्थक बंडखोरांना बळ देत असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी ‘मातोश्री’च्या आशीर्वादाने रामदास कदम यांच्या गटातील या असंतुष्टांची पदावरुन उचलबांगडी केली होती. दापोलीला पक्षप्रमुखांचा निरोप घेऊन आलो होतो. ज्यांनी शिस्तीचा भंग केला त्यांच्यावर कारवाई केली, अशी सूचक प्रतिक्रिया यावेळी अनिल परब यांनी दिली होती. त्यामुळे ‘मातोश्री’च्याच सांगण्यावरुन रामदास कदम आणि त्यांचा मुलगा योगेश कदम यांचे पंख छाटण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता रामदास कदम नवा पर्याय शोधणार का, हे पाहावे लागेल. मुंबईतील पत्रकारपरिषदेत ते एखादा राजकीय बॉम्बही टाकू शकतात, अशी शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.
रत्नागिरीतील बेकायदेशीर रिसॉर्टच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मंत्री अनिल परब हे सध्या अडचणीत आले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण बाहेर काढले होते. मात्र, यासाठी रामदास कदम यांच्या माध्यमातून रसद पुरवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. रामदास कदम यांच्या फोनवरील संभाषणाच्या ऑडिओ क्लीप्समुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली होती. मात्र, रामदास कदम यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली होती. पक्षनेतृत्त्वाने यावर मौन बाळगत त्यांच्यापासून अंतर राखले होते. त्यानंतर आता पक्षाने थेट बालेकिल्ल्यातच पंख छाटल्याने रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांसमोर यायचे ठरवले असावे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:06 PM 17-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here