मिरजोळे येथे सापडलेल्या निखिल कांबळे (१३) या शाळकरी मुलाच्या खुनाचे गूढ पोलिसांना उकलले आहे. उसने घेतलेले केवळ सातशे रुपये परत देण्यासाठी निखिलने तगादा लावल्याने त्याच्याकडून उसने पैसे घेणाऱ्या मित्रानेच त्याचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा मृतदेह बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या निखिल या तेरा वर्षांच्या शाळकरी मुलाचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मिरजोळे येथे घवाळवाडीजवळ या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह चरात टाकण्यात आला होता. नंतर मृतदेह लपवण्यासाठी त्याच्यावर दगड ठेवण्यात आले होते. बेपत्ता निखिल याचा शोध गेले बारा दिवस सुरू होता. या परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही घटना उघड झाली.
