आजच्या युगातल्या तरुणांना संदेश देणारे काम ज्येष्ठ नागरिकांच्या हातातून घडत आहे. त्यांच्या हाताला हात धरून तरुणांनी त्यांना ताकद दिली पाहिजे, अशी अपेक्षा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. लांजा येथे श्री. सामंत यांच्या उपस्थितीत रविवार दि. २३ रोजी नाना-नानी शांती निवासाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. स्वर्गीय सौ. रमा नारायण शेट्ये ट्रस्टतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी या नाना-नानी शांती निवासाची निर्मिती करण्यात आली आहे. खासदार हुसेन दलवाई यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यावेळी रमा नारायण शेट्ये ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम वंजारे यांनी स्वागत करून संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. लांज्यासारख्या एका छोट्या गावात सामाजिक कामात अग्रेसर असणारे सर्व ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन एक संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी काम करतात, ज्येष्ठ नागरिकांसाठी “नाना-नानी शांती निवास”सारख्या सुविधा उपलब्ध होतात, एवढ्यावरच न थांबता या संस्थेमध्ये कार्यरत असणारे सर्व सदस्य अतिशय तळमळीने सर्वच सामाजिक स्तरावर उत्तम काम करताना आढळून येतात. हे आजच्या युगातील तरुणांना, एक उत्तम संदेश देणारे उदाहरण आहे, असे गौरवोद्गार श्री. सामंत यांनी यावेळी काढले. आजच्या सोशल मीडियाच्या युगात तरुण पिढी त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर जास्तीत जास्त सोशल मीडियासाठी करत आहे. या तरुणांनी अशा समाजोपयोगी कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन ग्रामीण स्तरावर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचून त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. समारंभाला खासदार विनायक राऊत, उद्योजक आर. डी. सामंत, चेअरमन जयवंत शेट्ये, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिल्पा पटवर्धन, महंमदशेठ रखांगी, नगराध्यक्ष मनोहर बाईंग उपस्थित होते.
