कोकणातील ”कवडा रॉक फिशिंग” स्पर्धेत रत्नागिरीच्या स्पर्धकांची बाजी

0

साहसी पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून उदयास येत असलेल्या ‘कवडा रॉक’ या पर्यटन स्थळाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी कवडा रॉक किंग ग्रुप आणि मालवण अँगलिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अँगलिंग फिशिंग कॉम्पिटीशन म्हणजेच गळ पद्धतीने मासे पकडण्याची स्पर्धा नुकतीच कवडा रॉक येथे घेण्यात आली. कवडा रॉकवर प्रथमच आयोजित केलेल्या अँगलिंग (फिशिंग) स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे प्रथम 20 हजार रुपयांचे पारितोषिक रत्नागिरीच्या अनिकेत जांभळे या तरुणाने पटकावले. मालवणपासून 9 किमी अंतरावर समुद्रात हे बेट वसलेले असून खोल समुद्रात घेण्यात येणारी ही पहिली स्पर्धा ठरली आहे. या स्पर्धेमुळे कवडा रॉकचे महत्त्व आणखी वाढणार आहे, असा विश्वास मालवण अँगलिंग क्लबचे गुरुनाथ राणे, सचिन गोवेकर यांनी व्यक्त केला. मालवण अँगलिंग क्लबतर्फे येथील कवडा रॉक, चिवला बीच येथे प्रथमच आयोजित अँगलिंग स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेस चेन्नई, केरळ, कर्नाटक, गोवा, मुंबई आणि रत्नागिरी येथील अँगलर्स व पर्यटकांनी हजेरी लावली. स्पर्धेस अँगलर्स आणि पर्यटक मिळून 80 जणांनी हजेरी लावली. सर्व अँगलर्स आणि पर्यटक सकाळी 8 वाजता बोटीने कवडा रॉक येथे रवाना झाले. पहिल्या 10 मिनिटातच वेंगुर्ले येथील शंकर मेस्त्री या स्पर्धकाने पहिला मासा पकडला. त्यानंतर सर्वच स्पर्धकांमध्ये चढाओढ सुरू होऊन मासे मिळू लागले. पकडलेल्या प्रत्येक माशाचे वजन करून तो पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी स्वयंसेवकांचे सहकार्य केले. सहभागी स्पर्धक तसेच पर्यटक स्पर्धेबरोबरच कवडा रॉक परिसर व समुद्राच्या विलोभनीय दृश्याचा आनंद लुटत होते. स्पर्धेसाठी खास डिझाइन केलेल्या टी शर्टमुळे कवडा रॉक निळ्या रंगाने फुलून गेला होता. अँगलर्सना मिळत असलेले विविध प्रजातींचे मासे पाहून पर्यटक खुश होत होते. सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही स्पर्धा सुरू होती. सायंकाळी 6 वाजता चिवला बीच येथे बक्षीस वितरण समारंभ झाला. त्यावेळी कोकणातील पर्यटन वाढीला हातभआर लावणारे राजू परुळेकर पाटील, कोकोशेडचे प्रशांत रसाळ, बे वॉच कॅफेचे राहुल वराडकर आणि सचिन आरोलकर उपस्थित होते. स्पर्धा आयोजनासाठी मालवण अँगलिंग क्लबचे सचिन गोवेकर, गुरू राणे, लक्ष्मीकांत कांबळी, प्रियाल लोके, सिझर डिसोझा, सुशांत गोवेकर रुद्राक्ष आचरेकर आणि सहकाऱ्यांनी मेहनत घेऊन कवडा रॉकवरील पर्यटन वृद्धीसाठी भरविलेली ही पहिली-वहिली फिशिंग स्पर्धा यशस्वी झाली. रत्नागिरीचा अनिकेत जांभळे यांना प्रथम 20 हजार रुपयांचे पारितोषिक, द्वितीय 10 हजार रुपयांचे पारितोषिक केरळचे अखिल राज यांना, तर 5 हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक रत्नागिरीच्या सुरज बावणेला मिळाले. वेंगुर्ले येथील शंकर मेस्त्री, रत्नागिरीतील मंदार जाधव, कोईंबतूरचे बालासिंग, मुंबईचे रुपल मोहिते, केरळचे श्रीकांत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून 500 रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देण्यात आली.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here