छत्रपती शिवरायांचा अवमान: आदित्य ठाकरे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना म्हणाले…

0

मुंबई : कर्नाटकातील बेंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनानंतर महाराष्ट्रात सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहे. आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या विषयावर भाष्य केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करून माफी मागितली पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. कर्नाटक राज्यात मराठी भाषकांचा विरोध होत आहे. या स्थितीची दखल केंद्र सरकारने घेणे आवश्यक आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. मराठी भाषकांवर अन्याय होत असून तो होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. महाराष्ट्र शांत आहे, असे सांगत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराजांच्या पुतळ्याचा दु्ग्धाभिषेक केला पाहिजे, तसेच त्यांनी विटंबनेप्रकरणी माफी मागावी, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातूनही या विषयावर भाष्य करत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदी हे काशीत जाऊन छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा गौरव करतात. बोम्मई यांनी हे समजून घेतले पाहिजे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

कर्नाटकात वेगळे व महाराष्ट्रात जगावेगळे अशी भाजपवाल्यांची एकंदरीत तऱ्हा असल्याची टीकाही शिवसेनेने केली आहे. पंतप्रधानांनी काशीमध्ये मांडलेला विचार चार दिवसांनी बंगळुरूत पोहोचला नाही असा खोचक टोलाही शिवसेनेने भाजपला आणि कर्नाटक सरकारला लगावला आहे. काशीत शिवरायांचा सन्मान आणि बंगळुरूत अपमान हे चालणार नाही हे ढोंग आहे. बंगळुरूचे राजभवन गाठा आणि बोम्मईंचे सरकार आता घालवाच, असे शिवसेनेने म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:07 PM 21-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here