मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत श्री शिवछत्रपती पुरस्कार सोहळा संपन्न

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळा शनिवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे दिमाखात संपन्न झाला. महाराष्ट्रातील पदकविजेत्यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले, स्पर्धा संपल्या की सर्व घरी जातात, पण त्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक कोण करणार? पुरस्कार मिळत नसतो. तो मिळवावा लागतो. तो तुम्ही मिळवलात. अटकेपार झेंडा रोवणाऱया तुम्हा सर्वांनाच मानाचा मुजरा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. पुण्याचे क्रीडा संघटक पंढरीनाथ पठारे यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात 63 खेळाडूंना गौरविण्यात आले. याप्रसंगी गुवाहाटी येथे झालेल्या ‘खेलो इंडिया गेम्स’मधील पदकविजेत्यांचाही सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, शिवसेना खासदार अरविंद सावंत, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, विधानसभा सदस्य राहुल नार्वेकर, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया या मान्यवरांची उपस्थिती होती.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here