कोकणातील आंबा बागायतदार, शेतकऱ्यांचे आज मुंबईत आंदोलन

0

रत्नागिरी : कोकणात आंबा बागायतदार आणि शेतकरी प्रथमच एकत्र येत असून कोकणातील शेतकऱ्यांचे मुंबईतील पहिले आंदोलन आज (दि. २३ डिसेंबर) आझाद मैदानावर होणार आहे. मुख्य समन्वयक प्रकाश साळवी आणि समृद्ध कोकणचे संजय यादवराव यांनी ही माहिती दिली.

गेली पाच वर्षे हवामान बदलामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. त्यातच गेली दोन वर्षे सलग दोन चक्रीवादळे आली. करोनाचे संकटही याच काळात आले. त्यामुळे कोकणाची मुख्य अर्थव्यवस्था असलेला हापूस आंबा आणि याकरिता प्रचंड परिश्रम करणारा कोकणातील आंबा बागायतदार अतिशय अडचणीत आला. अतिशय कमी उत्पादन आले किंवा विक्री न करता आल्यामुळे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे गेली पाच वर्षे कर्जाची परतफेड झाली नाही. यामुळे बँका नवीन कर्ज देत नाहीत. कोकणात लाखो कुटुंबांचे घर चालवणारा कोकणातील हापूस आंबा उद्योग अतिशय कठीण काळातून जात आहे.

दुर्दैवाने यावर्षी कोकणात सतत चार दिवस अवकाळी पाऊस पडला. पुन्हा एकदा सर्व मोहर खराब झाला किंवा आंब्याला डाग पडले. यावर्षीसुद्धा हापूस आंब्याचे पीक अडचणीत आले आहे. उद्ध्वस्त झालेल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांना या वर्षी मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कोकणातील आंबा बागायतदारांना शासन कधीच मदत करत नाही. २०१५ मध्ये तत्कालीन शासनाने व्याजमाफी जाहीर केली पण प्रत्यक्षात दिली नाहीं. त्यानंतर व्याजामध्ये सवलत देतो, असे सांगण्यात आले. तीही दिली नाही. कोकणातला शेतकरी, आंबा बागायतदार कायम दुर्लक्षित आहे.

कोकणातील आंबा उद्योगाला पुन्हा उभारणी मिळावी आणि कोकणच्या मुख्य अर्थव्यवस्थेला आधार मिळावा, याकरिता कोकणातील शेतकरी आणि बागायतदार पहिल्यांदा मुंबईत आझाद मैदान येथे आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणार आहे. कोकण आंबा उत्पादक व विक्रेता संघ, पावस, देवगड, केळशी, अलिबाग येथील आंबा बागायतदार संघ आणि शेतकरी संघटना, कोकण शक्ती महासंघ, कोकण हायवे समन्वय समिती आणि समृद्ध कोकण प्रदेश संघटना अशा कोकणातील संघटनांनी एकत्र येऊन हे आंदोलन पुकारले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:05 AM 23-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here