परशुराम घाटातील चौपदरीकरणास अखेर सुरुवात

0

चिपळूण : गेली पाच वर्षे पेढे, परशुराम ग्रामस्थांच्या विरोधामुळे रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाच्या कामाचा नारळ अखेर गुरुवारी फुटला. पोलिस बंदोबस्तात काम सुरू करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. याबाबत झालेल्या बैठकीत पेढे, परशुराम ग्रामस्थांनी चौपदरीकरणाला आपला विरोध नसल्याचे सांगून कामाला आडकाठी होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यामुळे गुरुवारी सकाळी यंत्रसामग्री दाखल झाली आणि काम सुरू झाले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका ठेवल्याने अडचण निर्माण झाली नाही. या कामाकडे ग्रामस्थ फिरकलेही नाहीत. १० पोकलेन, जेसीबी व यंत्रसामुग्रीच्या साह्याने ठेकेदार कंपनीने धडाक्यात कामाला सुरुवात केली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात पेढे व परशुराम येथील संपादित जागेचा मोबदला कुळांना मिळत नसल्याने ग्रामस्थांनी परशुराम घाटातील कामास विरोध केला होता. दोन वर्षांपूर्वी पोलिस बंदोबस्तात काम सुरू करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यासशासनाकडून तीनमहिन्यांसाठी स्थगिती मिळाली होती. दरम्यान, येथील अॅड. ओवेस पेचकर यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर परशुराम घाटातील काम पोलिस बंदोबस्तात सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी पहिल्या टप्प्यात सबंधित अधिकारी, ठेकेदार कंपनी व पेढे परशुराम संघर्ष समितीची बैठक घेऊन चौपदरीकरणाचे काम सुरू करणार असल्याचे सांगितले होते.

परशुराम ग्रामस्थांची होणार ग्रामसभा ग्रामस्थांनी कामास सहकार्याची भूमिका ठेवली असली तरी त्यांनी काही मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. परशराम घाटात शेतीकडे जाण्यासाठी पाखाडी, अंडरपास, संरक्षक भिंती आदी मागण्या केल्या आहेत. परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर अंडरपास की, उड्डाणपूल याचा निर्णय परशुराम ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेतला जाणार आहे. त्यानंतर ग्रामसभेची मागणी प्रशासनाकडे कळविली जाणार आहे.

त्यानुसार २२ रोजी घाटातील कामाचे सीमांकन करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी सकाळी प्रत्यक्षात रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. प्रांताधिकारी पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे, राष्ट्रीय महामार्गचे आर. आर. मराठे यावेळी उपस्थित होते. कामात कोणाचेही अडथळे येऊ नयेत, यासाठी ९पोलिस अधिकारी व १३० पोलिसांचा बंदोस्त ठेवला होता.

पेढे येथील फरशी तिठा येथून सवतसडा धबधब्यापर्यंत कामाचे टप्पे करून चौपदरीकरणाच्या कामास धडाक्यात सुरूवात करण्यात आली. संपादित ४५ मिटर जागेतील झाडी तोडून रस्त्यालगतचे खडक, मातीचे कठडे पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने खोदण्याचे काम सुरू होते. ठेकेदार चेतक कंपनीकडून १० पोकलेन, तसेच जेसीबी व डंपरची यंत्रसामुग्री कामास लावली होती. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षांपासून रखडलेल्या कामास चालना मिळाली आहे. सवतसडा धबधब्याच्या पुढे मुख्य घाटात रहदारीचा रस्ता चालू ठेऊन डोंगर कटाई केली जाणार आहे. घाटात काम सरू असलेल्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्याचे नियोजन आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:17 AM 24-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here