कशेडी घाटातून प्रवास करताना सावधान

0

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातून प्रवास करताना चाकरमान्यांनी जरा सावधानता बाळगण्याची गरज आहे. अतिवृष्टीमुळे घाटातील काही भाग व एक मोरी दिवसेंदिवस खचत चालली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून त्यावर वेळोवेळी मलमपट्टी करण्यात येते. मात्र, मुसळधार पावसात हा भाग अधिकच खचत आहे. त्यामुळे जरा सावधान! मोरीचे बांधकाम करताना ब्लास्टींग झाल्याने हा संपूर्ण मोरीवरील रस्ता आता तब्बल अडीच फूटापेक्षा अधिक खाली खचू लागला आहे. हे काम  खेडमधील दळवी कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आले. यानंतर मे 2013 मध्ये हे काम पूर्ण झाले. जून 2013 च्या सुरूवातीपासूनच पावसाने संततधार धरल्याने पुन्हा रस्ता खचला.  आता चौपदरीकरणाने वेग घेतल्यामुळे कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग खोदण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, तो पर्याय उपलब्ध होईपर्यंत कशेडी घाटातील ही जागा डेंजर झोन म्हणून ओळखली जाणार आहे. मात्र, ही मोरी ठेकेदारांसाठी दरवर्षी कुरण ठरली आहे. आजपर्यंत कोट्यवधी रूपये यासाठी खर्च झाले आहेत. या वर्षीदेखील ही 110 मीटर अंतराची मोरी खचली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता प्रकाश गायकवाड यांनी या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी कशेडी वाहतूक पोलिसांना बंदोबस्ताची विनंती केली आहेे. मोरीच्या 110 मीटर अंतरात ये-जा करणार्‍या अवजड वाहनांना वेग कमी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या महिन्याच्या प्रारंभी सार्वजनिक बांधकाम  मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौर्‍यावेळी मोरीवर घट्ट डांबराचे थर देऊन भेगा बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो मंत्र्यांच्या दौर्‍यापुरताच तकलादू ठरला आहे. आता गणेशोत्सव जवळ येत असल्याने या मोरीची दुरूस्ती तत्काळ करणे गरजेचे आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येत असतात. यावेळी महामार्गावरील वाहतूक देखील वाढते. अशावेळी ही मोरी सुस्थितीत असल्यास महामार्गावरील वाहतूक खंडीत होऊ शकत नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने याची तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here