चिपळूण तालुक्यातील कुशिवडे येथील जंगलात १८ गावठी बॉम्ब ठेवल्याप्रकरणी खेरशेत येथील किरण किसन कदम (३८) याला सावर्डे पोलिसांनी अटक केली आहे. या संशयित आरोपीने कुशिवडे येथील जंगलात बॉम्ब ठेवले असल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी घडली होती. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील मंगेश शंकर नारकर (४६, रा. कुशिवड़े सोनारवाडी) यांनी दिली होती. यानुसार कुशिवड़े शिंगवणवाडी येथील सागर रामचंद्र तांदळे व निलेश मनोहर शिगवण असे दोघेजण ८ फेब्रुवारी रोजी कुशिवडे देवाची सहाण पोटाचा माळ येथील जंगलात आपल्या बैलांचा शोध घेण्यासाठी गेले होते. यावेळी या दोघांना वाठिकाणी १८ गावठी बॉम्ब ठेवल्याचे दिसून आले. याची माहिती या दोघांनी पोलीस पाटील मंगेश नारकर यांना दिली. यानंतर या पोलीस पाटलांनी ही माहिती सावर्डेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांना दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच १८ गावठी बॉम्ब ताब्यात घेतले. तपासाअंती खेरशेत येथील किरण किसन कदम वाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी किरणकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपणच शिकारीसाठी गावठी बॉम्ब ठेवले असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड, पोलीस हवालदार प्रदीप गमरे, राजू अरवट, राजेश चव्हाण, दीपक पारकर, राजा पवार आदींनी केला.
