राज्यपालांना डावलून विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास अजित पवारांचा विरोध

0

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या परवानगीविना विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यावरुन महाविकासघाडीच्या नेत्यांमध्ये फूट पडल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवर असल्याचे समजते. राज्यपालांना डावलून विधानसभाध्यक्षांची निवडणूक झाल्यास घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो, असा सल्ला कायदेतज्ज्ञांकडून सरकारला देण्यात आला. त्यामुळेच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांच्या मंजुरीशिवाय अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास विरोध दर्शविला. परिणामी महाविकासआघाडीने विधानसभाध्यक्ष निवडणुकीच्या मुद्द्यावरुन माघार घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्यपालांना खरमरीत पत्र धाडले होते. विधिमंडळातील कायदे आणि नियम राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाहीत. नियमातील बदल हे कायदेशीर आहेत की नाही हे तपासण्यासाठी अनावश्यक वेळ घेऊ नये, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले होते. या पत्राला राज्यपालांकडून मंगळवारी सकाळी उत्तर पाठवण्यात आले. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिफाफाबंद पत्र पाठवले. त्यामुळे पत्रातील नेमका तपशील समजू शकलेला नाही. मात्र, एकूणच परिस्थिती पाहता राज्यपालांना डावलून निवडणूक घेतली तर सरकार मोठ्या कायदेशीर पेचात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने तुर्तास या लढाईतून माघार घेतल्याची माहिती आहे.

राष्ट्रपती राजवटीच्या भीतीने माघार?

विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कालपर्यंत अगदी आग्रही असणाऱ्या महाविकासआघाडी सरकारमध्येच या मुद्द्यावरुन फूट पडली होती. विधानसभाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही होती. मात्र, राज्यपालांच्या परवानगीशिवाय विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक रेटून नेल्यास कायदेशीर प्रश्न उद्भवू शकतात. तसे घडल्यास भाजपकडून यापूर्वीच न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यपालांना डावलले गेल्यास तेदेखील टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यपाल अगदी राष्ट्रपती राजवटीची शिफारसही करू शकतात. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारमधील एक गट कोणताही धोका पत्कारायला तयार नाही. त्याऐवजी विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीला मंजुरी मिळाल्यावर विशेष अधिवेशन बोलावता येईल, असा एक मतप्रवाह महाविकासआघाडीत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:20 PM 28-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here