रत्नागिरी : मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये डाळवडा खाल्ल्याने दोन वर्षाचा चिमुरडा अत्यवस्थ झाल्याची घटना नुकतीच घडली होती. याबाबत रत्यानागिरी खबरदार मधून वृत्चीत प्रसारित करण्यात आले होते. याची दखल घेत गाडीचा खानपान ठेका असलेल्या साई कॅटरिंग सर्व्हिसेसला 1 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. 15 दिवसापूर्वी या गाडीतून सचिन किसन शिंदे हे प्रवास करीत होते. खेड स्टेशनदरम्यान खानपान सेवा पुरवणार्या विक्रेत्याकडून त्यांनी 25 रु. देऊन डाळवडा खरेदी केला. हा वडा खात असताना मुलाला जोरदार ठसका लागला व वडा उलटून बाहेर आला. यामध्ये प्लास्टिकचा तुकडा असल्याचे वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी मुलाच्या तोंडातून प्लास्टिकचे तुकडे बाहेर काढले. त्याचबरोबर डाळवडा तपासला. त्यामध्येही प्लास्टिक तुकडे दिसले. त्यांनी वडा विक्रेत्याला शोधून त्याला प्लास्टिक तुकडे दाखवले. मात्र त्याने लसणीची साल असल्याचा कांगावा केला. मात्र प्रवासी संतप्त झाले. त्यानंतर त्याने ठेकेदाराला बोलावले. त्यावेळी त्याने बेजबाबदारपणे उत्तरे दिली होती. या चिमुरड्याला हा वडा खाल्ल्याने अस्वस्थ वाटत असल्याने त्याच्या वडिलांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान छोट्या बालकाने केलेल्या उलट्यांमधून प्लास्टीकचे तुकडे बाहेर पडले. प्रवाशांच्या जिवाशी खेळणार्या ठेकेदाराविरुध्द सचिन शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल कोकण रेल्वे प्रशासनाने घेतली असून, मुख्य वाणिज्य प्रबंधकांनी साई कॅटरिंग सर्व्हीसेसला 1 लाखाचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर अशी घटना पुन्हा घडल्यास परवाना रद्द करण्यात येईल, अशी सक्त ताकीदही दिली आहे.
