नेत्रावती, मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या थांब्यांसाठी प्रजासत्ताक दिनापासून बेमुदत उपोषणाचा इशारा

0

रत्नागिरी : कोकण रेल्वेवरील नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वरचा थांबा मिळावा, या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनापासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून वारंवार पत्रव्यवहार करूनही जाग येत नसलेल्या रेल्वे प्रशासनाविरोधात प्रजासत्ताकदिनी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर ग्रुप तसेच संगमेश्वरवासीयांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसायचे ठरविले आहे. संगमेश्वर स्थानकातून रेल्वेला चांगला महसूल मिळत असतानाही रेल्वे प्रशासनाकडून हा दुजाभाव का केला जातो, असा संगमेश्वरच्या नागरिकांचा प्रश्न आहे.

कोकणवासीयांचे मुंबईत मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यातही संगमेश्वर भागात राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. संगमेश्वर स्थानकात नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्या थांबाव्यात यासाठी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपकडून वारंवार रेल्वेकडे पत्रव्यवहार सुरू आहे. त्याला स्थानिकांचीही मोठी साथ लाभली आहे.

संगमेश्वर रोड थांबा रेल्वेसाठी सर्व दृष्टीने फायदेशीर ठरत असून दिवसेंदिवस या स्थानकाचा वापर करणारे प्रवासी वाढतच आहेत. त्यामुळे आर्थिक कारणांवरून थांबा नाकारण्याआधी रेल्वेने त्याची तपासणी करावी. तसेच संगमेश्वरपेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या काही स्थानकांवर या दोन्ही गाड्या थांबतात, हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. त्यामुळे कायम नकारघंटा वाजवण्याची वृत्ती सोडून देऊन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करावेत, अशी विनंती निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:03 AM 29-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here