कोरोना चाचणीसाठी 24 तास बूथ उभारा, केंद्राचे राज्यांना आदेश

0

नवी दिल्ली : देशात कोविड-19 च्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना विविध ठिकाणी कोरोना चाचणीसाठी 24 तास बूथ उभारण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्र सरकारने राज्यांना या बूथवर कोविड-19 साठी 24 तास जलद प्रतिजन चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे आणि आरोग्य कर्मचार्‍यांना लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वदेशी बनावटीच्या चाचणी किट वापरण्यास प्रोत्साहित केले आहे.

राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्च चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीला ताप, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, श्वास लागणे, शरीरात वेदना, चव किंवा वास कमी होणे, थकवा आणि जुलाब होत असल्यास त्याला कोविड-19 चे संशयित रुग्ण मानले पाहिजे.

केंद्रीय आरोग्य सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक यांनी पत्रात म्हटले आहे की, “सर्व संशयित व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे. तपासाचा अहवाल येईपर्यंत, अशा लोकांनी ताबडतोब स्वत:ला विलगीकरणात ठेवावे आणि आरोग्य मंत्रालयाच्या संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.”

दरम्यान, महाराष्ट्र आणि प्रामुख्याने मुंबईत रुग्णवाढीचा वेग कमालीचा वाढलेला पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र लिहिलंय. यामध्ये जानेवारी महिन्यात राज्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण दोन लाखांच्या पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यांनी धोक्याचा इशारा देत म्हटलं आहे की, ”ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका नाही. ओमायक्रॉन सौम्य आहे असे समजू नका. लसीकरण न झालेल्या आणि इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांसाठी ओमायक्रॉन जीवघेणा ठरू शकतो.”

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:19 PM 01-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here