नर्सिंग क्षेत्रामध्ये सेवा, समर्पणाला मोठी किंमत : बाळ माने

0

रत्नागिरी : कोरोनाच्या किती लाटा आल्या तरीही आपली प्रतिकारशक्ती पोषक आहारातून, व्यायाम, योगसाधनेतून वाढवावी. त्यातूनही कोणी आजारी पडले तरी आपण सेवाशुश्रुषा करणार आहोतच. करिअरमध्ये प्रत्येकाला पैसा, मान हवा असतो. परंतु नर्सिंग क्षेत्रामध्ये सेवा, समर्पणाला मोठी किंमत आहे. अन्य ठिकाणी व्यवसाय असतो, सेवा नसते. परंतु आपल्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकीला महत्त्व असून विद्यार्थ्यांनी ती जपली पाहिजे, असे प्रतिपादन दि यश फाउंडेशनचे विश्वस्त तथा माजी आमदार बाळ माने यांनी केले.

दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये कै. यशवंतराव माने यांच्या ३६ व्या स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी सहव्यवस्थापकीय विश्वस्त माधवी माने, मिहिर माने, विराज माने, रजिस्ट्रार शलाका लाड, माध्यमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक पांडुरंग पाचकुडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक घवाळी, प्र. प्राचार्य रमेश बंडगर, प्रा. चेतन अंबुपे उपस्थित होते.

यावेळी बाळ माने म्हणाले, ३६ वर्षांपूर्वी वडील यशवंतराव माने यांचे निधन झाले. वडिलांचा वारसा आम्ही पुढे जपत आहोत. आपली संस्कृती जपण्याचे काम करत आहोत. कोकणात सामाजिक, राजकीय प्रबोधन होण्याची गरज आहे. समाजाची प्रगती, उन्नती म्हणजे निरनिराळ्या भौतिक सुविधा मिळाल्या म्हणजेच ती पूर्ण होते, असे समजण्यात अर्थ नाही. दोन वर्षे करोना महामारीमुळे सारे जग संकटात आहे. परंतु भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनामुळे १३५ कोटी लोकसंख्येच्या भारतात लस निर्मिती झाली आणि दिलासा मिळाला.

ते पुढे म्हणाले की, आपला देश इतर देशांपेक्षा या संकटातून वाचला. हे वाचवण्याचे यश आपले पूर्वज व संस्कृतीचे आहे. या देशाला वेगळी संस्कृती आहे. कुटुंबसंस्था, मित्रमंडळी, अनेक ठिकाणचे लोक मिळून समाज तयार होतो. परदेशांमध्ये आजारामुळे दगावणाऱ्यांची संख्या जास्त होती. आपलेही नुकसान झाले, परंतु प्रमाण कमी होते. आपला आहारविहार, संस्कृती, कुटुंबव्यवस्था घालून दिली आहे. ग्रामीण भागात पूर्वीपासूनच सोशल डिस्टन्सिंग, नियम आहे.
माने म्हणाले, करोना काळात आपल्या नर्सिंगच्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनीही रत्नागिरीकरांची सेवा केली. २१-२२ वर्षांचे पाल्य या सेवेसाठी जात होते. पालकांनाही याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी सबब न सांगता ही सेवा केली पाहिजे, या संकटातून पळून चालणार नाही, असे पालकांनी सांगितले. या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनीही केले. रक्ताचे नातेवाईकसुद्धा जेव्हा उपचार करताना घाबरत होते, त्या वेळी आमच्या विद्यार्थ्यांनी धीटपणाने तोंड दिले. याला संस्कार म्हणतात. आपल्या संस्थेच्या नावातच यश आहे. त्या नावाची ही ताकद आहे.

रजिस्ट्रार शलाका लाड म्हणाल्या, कै. यशवंतरावांचा सामाजिक वारसा जपताना बाळासाहेबांनी प्राथमिक, माध्यमिक शाळा, नर्सिंग कॉलेज सुरू केले. वडिलांच्या निधनानंतर २१ व्या वर्षापासून ते राजकारण, समाजकारणात सक्रिय आहेत.
यशवंतराव माने माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पाचकुडे म्हणाले, यशवंतरावांना आदराने दादा म्हणून हाक मारायचे. १९६२ ते १९८० या काळात त्यांनी जनसंघ, भाजपाचे काम केले. रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती, पुलोद सरकारमध्ये मत्स्य उद्योग खात्याचे अध्यक्ष (कॅबिनेट दर्जा), मच्छीमार संघाचे अध्यक्ष होते, असे सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:45 AM 03-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here