देवरूख : संशयितरीत्या गुरांची अवैध वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी नाकाबंदी दरम्यान संगमेश्वर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री पकडली. या गाडीमधून 8 गुरांची गुहागर ते कोल्हापूर इचलकरंजीकडे वाहतूक करण्यात येत होती. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोमनाथ अपन्ना हालोली (रा. बेळगाव, जि. कर्नाटक) व सिकंदर मगदुम शेख (रा. इचलकरंजी जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. गुहागर तालुक्यातील आबलोली येथून मुंबई-गोवा महामार्गावरून संशयीतरीत्या गुरांची वाहतूक होत असल्याची खबर संगमेश्वर पोलिसांना मिळाली होती. यानंतर संगमेश्वर पोलिसांनी गुरांची वाहतूक करणारी गाडी पकडण्यासाठी बस स्थानकासमोरील नाक्यावर सापळा रचला. ही गाडी या ठिकाणी येताच पोलिसांनी गाडी थांबवून संपुर्ण गाडीची तपासणी केली. यावेळी या गाडीच्या हौद्यामध्ये दाटीवटीने दोरीच्या सहाय्याने बांधून ठेवलेल्या सहा गाई व दोन वासरे पोलिसांना दिसून आली. पोलिसांनी गुरांसहीत बोलेरो गाडी जप्त केली आहे. गाडी व गुरांची किंमत सुमारे 4 लाख 70 हजार इतकी आहे. पोलिसांनी सोमनाथ हालोली व सिंकदर शेख यांच्याविरोधात प्राण्यांशी क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर विभूते करीत आहेत.
