रत्नागिरी विमानतळाचा नामकरण विधी संपन्न झाला कि काय ? कधी झाला ? कुणी केला ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेकांना हि माहिती ‘गुगल बाबाच्या’ माध्यमातून मिळाली आहे. गुगल मॅप वर ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक रत्नागिरी एअरपोर्ट, मुसलमानवाडी, रत्नागिरी’ असे नामकरण दिसून येत आहे. स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी देखील याबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती मिळत आहे. गुगल मॅप वर एखाद्या स्थळाला नाव देणे तितकेसे सोपे नाही. दिलेले नाव गुगल यंत्रणेकडून व्यवस्थित तपासण्यात येते, त्यासंदर्भात पत्रव्यवहार केला जातो तर कधी त्या स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन खात्री केली जाते. यामुळे रत्नागिरी विमानतळाचे नवे नाव देखील अधिकृत यंत्रणेकडून खात्री केल्यावरच व तेथील तथ्य तपासूनच प्रदर्शित केले असेल असे बोलले जात आहे. हे नाव केंद्र सरकार कडूनच गेले असावे असा अंदाज देखील काही अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. या नामकरण विधी बाबतची सत्यता अजूनही पुढे आली नसून केवळ गुगल मॅप वर अशी नोंद असल्याचे पहावयास मिळत आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक रत्नागिरी एअरपोर्ट, मुसलमानवाडी, महाराष्ट्र असा गुगल मॅप वर असणाऱ्या पत्त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
