रत्नागिरी शहराला संस्कृतची मोठी परंपरा : जयराम आठल्ये

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला संस्कृतची मोठी परंपरा आहे. संस्कृतप्रेमी नागरिकही मोठ्या संख्येने आहेत. फडकेशास्त्री, आठल्येशास्त्री, शिधये शास्त्री यांच्यासारखे विद्वान येथे होऊन गेले. संस्कृतचा प्रसार झाला पाहिजे. संस्कृतमुळे वाणी शुद्ध होते, त्याकरिता प्रत्येकाने किमान १-२ तास अभ्यास करावा, सरावाने संस्कृत बोलणे सहज शक्य आहे. संस्कृतला पुन्हा उर्जितावस्था येण्याकरिता आणि या केंद्रात जास्तीत जास्त विद्यार्थी येण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन येथील गो. कृ. रानडे संस्कृत पाठशाळेचे सचिव जयराम आठल्ये यांनी केले.

केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय (नवी दिल्ली), गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रथम आणि द्वितीय दीक्षा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, संस्कृत विभाग प्रमुख तथा केंद्राधिकारी डॉ. कल्पना आठल्ये आणि शिक्षक हिरालाल शर्मा उपस्थित होते.

या वेळी डॉ. कल्पना आठल्ये यानी या सांगितले केंद्राला ६ वर्षे झाली असून रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही विद्यार्थी संस्कृत शिकून त्याचा प्रचारही करत आहेत. सरल संस्कृत शिक्षण केंद्रामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. गेल्या सहा वर्षामध्ये रत्नागिरी आणि परिसरातील ६०० पेक्षा जास्त व्यक्तींनी या केंद्राच्या माध्यमातून संस्कृतचे शिक्षण घेतले आहे. संस्कृत केंद्रात महिला अध्ययनार्थींची संख्या लक्षणीय आहे, असे त्या म्हणाल्या.

प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले, हा प्रत्यक्ष अभ्यासक्रम झाला असता तर जास्त उपयोग झाला असता. त्यमुळे आठवड्यातून एकदा प्रत्यक्ष घेण्याकरिता महाविद्यालय प्रयत्न करेल. मुंबई नंतर फक्त रत्नागिरी महाविद्यालयात विषय शिकवला जातो. अडचणीच्या काळात असतानाही हा विभाग सुरू आहे. ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये या संस्कृत प्रसार, प्रचारासाठी कार्यक्रम आखतात. संस्कृतची चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता येईल. संस्कृतचे वैभव इतरांपर्यंत पोहोचेल.

प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर राजश्री लोटणकर, रश्मी पालकर यांनी स्वागत गीत सादर केले. या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या वेळी काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आमचा शाळेत असतानाच संस्कृतशी संपर्क होता. परंतु आता सेवानिवृत्तीनंतर या केंद्रामुळे पुन्हा संस्कृत शिकता आले, बोलता आले. गेल्या वर्षात कोरोना महामारीत ऑनलाईन शिक्षण दिले जात होते. परंतु ते प्रत्यक्ष असते तर अधिक उपयोग झाला असता.

संस्कृतभाषा प्रमाणपत्रीय पाठ्यक्रम (प्रथमदीक्षा) यामध्ये सामान्य संस्कृत वाङ्मयचा परिचय, सामान्य संस्कृत व्यवहाराची क्षमता निर्माण करणे, असा उद्देश आहे. संस्कृतभाषा -दक्षतापाठ्यक्रम (द्वितीयदीक्षा) यामध्ये अध्ययनार्थी स्वतःचे विचार संस्कृतच्या माध्यमातून व्यक्त करण्यास समर्थ बनविणे असा आहे. तृतीय दीक्षेमध्ये संस्कृतमधील नीति आणि धार्मिक ग्रंथांचे अध्ययन जसे विदुरनीति, रामायण, मनुस्मृति, श्रीमद्भगवदगीता आदि ग्रंथांचा अभ्यास करता येईल.

अधिक माहितीसाठी डॉ . कल्पना आठल्ये (अधिकृतकेन्द्राधिकारी) – 7720072302, हीरालाल शर्मा (अनौपचारिक संस्कृत शिक्षण केन्द्रशिक्षक) – 8894649514, प्रा . स्नेहा शिवलकर -7264919314, दिनकर आलेवाड – 9987317266, सौ. रसिला पटेल – 9764419660, सौ. अक्षया भागवत – 9403564696 यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:11 PM 05-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here