पंतप्रधानांचा ताफा खोळंबल्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात, आज सुनावणी

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबच्या अतिसंवेदनशील भागात 20 मिनिटे खोळंबल्याचे प्रकरण गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी याबाबत थेट सरन्यायाधीशांपुढे याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दुसरीकडे केंद्रीय गृह मंत्रालय आणि पंजाब सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र समित्या नेमल्या आहेत.

पंतप्रधान मोदी हे बुधवारी फिरोजपूरच्या प्रचारसभेसाठी रस्तेमार्गाने चालले होते. मात्र शेतकरी आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखल्यामुळे मोदींच्या ताफ्याला माघारी परतावे लागले. ही सुरक्षेतील गंभीर त्रुटी असून याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करीत ऍड. मनिंदर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडता कामा नये. प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांच्या दौऱयादरम्यान त्यांच्या ताफ्यात मुख्य सचिव, डीजीपी वा त्यांच्या प्रतिनिधींच्या कार असल्या पाहिजेत. मोदींच्या पंजाब दौऱयात तेथील मुख्य सचिव किंवा डीजीपी यापैकी कुणी नव्हते, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी शुक्रवारी सरन्यायाधीश रमण्णा यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.

याचिकेत काय म्हटलेय?
मोदींचा ताफा रोखण्यास कारणीभूत ठरलेल्या सुरक्षा त्रुटींची सखोल चौकशी व्हावी आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी.
पंजाबच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी रस्ता मोकळा असल्याचे विशेष सुरक्षा समूहाला कळवले होते. पण प्रत्यक्षात रस्त्यावर आंदोलक होते. पोलिसांच्या मिलिभगतमुळे सुरक्षेचा बोजवारा उडाला.
पंजाब सरकार आणि तेथील पोलीस पंतप्रधानांना चोख सुरक्षा पुरवण्यास पूर्णतः अपयशी ठरले.

देशभर पडसाद
पंजाबमध्ये भाजपच्या नेत्यांनी तेथील राज्यपालांची भेट घेतली आणि पंजाबच्या गृहमंत्री व डीजीपी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली.
मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या टिळक भवनवर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले
महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी मुंबादेवी मंदिरात प्रार्थना केली.
नागपुरात भाजप युवा मोर्चाने पंजाब सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली.

मोदी राष्ट्रपतींच्या भेटीला; उपराष्ट्रपतींशीही चर्चा
केंद्र आणि पंजाब सरकारने सुरक्षा त्रुटींची चौकशी सुरू केली असतानाच राष्ट्रपतींनी पंजाबमध्ये घडलेल्या सुरक्षेसंबंधी त्रुटींची माहिती पंतप्रधानांकडून घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी सुरक्षेच्या त्रुटीबाबत चिंता व्यक्त केली, असे ट्विट राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले. दोघांच्या भेटीचे फोटोही पोस्ट केले गेले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही मोदींशी चर्चा केली.

पंजाबच्या समितीकडून 3 दिवसांत अहवाल
पंजाबच्या चन्नी सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत निवृत्त न्यायाधीश मेहताब सिंग गिल, प्रधान सचिव (गृह) आणि न्यायमूर्ती अनुराग वर्मा यांचा समावेश आहे. ही समिती सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करून केंद्रीय गृह मंत्रालयाला पुढील 3 दिवसांत अहवाल देणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:56 AM 07-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here