वैश्यवाणी समाजाच्या जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रसंगी उद्भवणाच्या अडचणीबाबत कामगार विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग कल्याण मंत्री डॉ. संजय कुंटे यांनी मार्ग काढून वाणी व वैश्यवाणी या जाती एकच आहेत असा तोडगा काढला. यामुळे यापुढे जातीचे प्रमाणपत्र देण्यास अडचण येणार नसल्याची माहिती, रत्नागिरी वैश्य समाज अध्यक्ष विकास शेट्ये, विजय खातू आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बाळ बोर्डेकर यांनी दिली आहे. हिंदू वाणी, हिंदू वैश्य व हिंदू वैश्यवाणी ही एकच जात आहे असा अहवाल आला होता, तो ग्राह्य मानत सन २००८ चे रद्द केलेले परिपत्रक, सन २०१४चा अहवाल व सन २०१८ च्या परिपत्रकानुसार आठवडाभरात जात प्रमाणपत्र व पडताळणी वैधता बाबत पुन्हा सन्मानकारक तोडगा काढला जाणार असल्याचे या बैठकीत मंत्र्यांनी सांगितले.
भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी याबाबत सतत पाठपुरावा करुन वैश्यवाणी समाजाला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न चालविला होता. त्यानुसार राजन तेली व भाजपचे जेष्ठ पदाधिकारी प्रमोद जठार यांनी संयुक्तिक बैठक मंत्र्यांच्या दालनात मंत्रालयात आयोजीत केली होती. वैश्य-वाणी आणि वाणी यावरून गेले काही दिवस निर्माण झालेला वाद आता संपल्यात जमा आहे.
