प्रशासनाचे हात मदतीसाठी अजूनही झटताहेत

0

रत्नागिरी : अमावस्येच्या काळरात्री सह्याद्रीच्या पायथ्याशी राहणार्‍या तिवरे-भेंदवाडीतील 22 जणांसाठी ती शेवटची सायंकाळी ठरली. वाडीच्या उशाशी असणार्‍या तिवरे धरणाला भगदाड पडले आणि  भेंदवाडीचा अर्धा भाग होत्याचा नव्हता झाला. रात्री उशिरा ही माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा भर पावसात कामाला लागली. घटनेच्या दिवसापासून सुरू झालेले मदतीचे हात आज एक महिन्यानंतरही राबत आहेत.तिवरे दुर्घटनेला उद्या 2 ऑगस्ट रोजी एक महिना होत आलेला असताना, पूर्वसंध्येला जिल्हाधिकार्‍यांनी याच्या आठवणी जागवल्या व मदतकार्याची माहिती दिली. चिपळूण शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत असलेले तिवरे भेंदवाडी येथील धरण हे दसपटीसाठी वरदानच ठरले होते. मात्र 2 जुलै रोजी धरणाला भगदाड पडले आणि भेंदवाडीतील अर्धीअधिक घरे नेस्तनाबूत झाली. शेतजमिनही वाहून गेली. पूर्ण क्षमतेने भरलेल्या या धरणातील ऐंशी टक्के पाणीसाठी काही तासातच रिकामे झाले. भेंदवाडीसह तीन-चार गावांचे नुकसान या पाण्याने केले. 22 व्यक्ती वाहून गेल्या, त्यातील दीड वर्षाच्या बालिकेचा मृतदेह आजपर्यत सापडलेला नाही. धरण फुटल्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. मात्र शासकीय यंत्रणेने याकडे दुर्लक्ष करीत, ग्रामस्थांचा सावरण्यासाठी हात दिला. घटनेची माहिती आपत्कालीन यंत्रणेकडून मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. मध्यरात्री दोन वाजता ते घटनास्थळी पोहचले. त्यांच्या सोबतच अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड व आदी दाखल झाले. रात्रीच्या अंधारात स्थानिक ग्रामस्थांसह मदतीला आलेले नागरिक, शासकीय कर्मचारी झटत होते. यात शासकीय यंत्रणेचा कोणताच गाजावाजा नव्हता. शासकीय कर्मचार्‍यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तात्काळ सूचना देत कामाला अधिक गती दिली.  तहसीलदार जीवन देसाई यांच्यासह त्यांचे सहकारी यांनी तर पुढील दोन-चार दिवस गावातच तळ ठोकत आपदग्रस्तांना मदतीचा हात दिला. दुर्घटनेनंतर मृतदेह सापडायला सुरुवात झाल्यावर त्यांचे तात्काळ शवविच्छेदन करुन ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यातील काही मृतदेहांवर सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्वत: जिल्हाधिकारी उपस्थित राहिले. जिल्हा मुख्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्यासह जिल्हा आपत्ती अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी माहिती देण्याची, वेगवेगळ्या  विभागांमध्ये समन्वय राखण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडली. दुर्घटनाग्रस्थांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था, जिल्ह्यातील नागरिकांनी पुढाकार घेतला. भांडी, कपडे यासारख्या वस्तूंची प्रचंड मदत दाखल झाली. या सर्व वस्तू अगदी रितसर नोंदी ठेवून वाटप करण्यात आल्या. 22 मृत व्यक्तिपैकी 19 जणांना राज्य शासनाकडून चार लाख तर पंतप्रधान सहाय्यता योजनेमधून दोन अशा प्रकारे सहा लाख रुपयांची मदत देण्यात आली. दोन मृतांच्या नातेवाईकांची तपासणी केली जात आहे. तर दीड वर्षाच्या बालिकेचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे तिघांची मदत अद्याप नातेवाईकांना दिलेली नाही. कायमस्वरूपी पुनर्वसन होईपर्यंत तेथील 15 जणांसाठी कंटेनर घरांची उभारणी केली जाणार आहे. या ग्रामस्थांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी अलोरे येथील पाटबंधारेच्या जागेवर माळीणप्रमाणे घरे उभारण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरु केली आहे. प्रत्येकी 415 स्वेअरफुटामध्ये 45 जणांना घरे बांधताना ती योग्य पध्दतीने आणि लवकर व्हावी, त्यांना नागरी सुविधा मिळाव्या यासाठी आता प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी स्थानिक व उत्कृष्ट काम करणार्‍या बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट यांची मदत घेण्याचा मानस जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला. गेल्या महिनाभरात आपद्ग्रस्तांसाठी व सर्व शासकीय यंत्रणांना एकत्र आणण्याचे महत्वाचे काम जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here