दिल्लीतील हॉस्पिटल्समध्येच कोरोनाचा विस्फोट; तब्बल 800 डॉक्टर पॉझिटिव्ह

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दिल्लीतील हॉस्पिटल्समधील डॉक्टरांनाही संसर्ग होत आहे. दिल्लीत जवळपास ७०० ते ८०० डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या डॉक्टरांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता संसर्ग झालेल्या या डॉक्टरांना ७ दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानंतर कोणतीही चाचणी न करता त्यांना ड्युटीवर रुजू होण्याचा सल्ला दिला जात आहे, दिल्लीच्या ईएसआय हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर रोहन कृष्णन यांनी ही माहिती दिली आहे.

दिल्लीतील हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. दिल्लीतील केवळ ५ मोठ्या हॉस्पिटल्समधील ८०० हून अधिक डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कात आलेले डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारीही आयसोलेशनमध्ये आहेत. मोठ्या प्रमाणात आरोग्यसेविका पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य व्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. रुग्णालयात नियमित तपासणी, ओपीडी आणि अनावश्यक शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत.

हॉस्पिटल्समधील सर्वात वाईट स्थिती दिल्लीच्या एम्समध्ये आहे. एम्समध्ये काम करणारे सुमारे ३५० निवासी डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हा आकडा फक्त कोविड पॉझिटिव्ह निवासी डॉक्टरांचा आहे, प्राध्यापक, पॅरामेडिकल कर्मचारी जोडले तर हा आकडा खूप मोठा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

‘एवढ्या मोठ्या संख्येने हॉस्पिटल आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याचा परिणाम आरोग्यसेवेर झाला आहे. दिल्ली एम्समध्ये बाह्यरुग्ण सेवा, नियमित प्रवेश आणि शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत’, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसांत दिल्लीतील एम्सचे सुमारे १५० निवासी डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दिल्लीतील इतर मोठ्या हॉस्पिटल्सची हीच स्थिती आहे. सुमारे ८० ते १०० डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत, असे असे सफदरजंग रुग्णालयातील सूत्रांनीही सांगितले. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील १०० हून अधिक डॉक्टरांना करोना संसर्ग झाला आहे. दुसरीकडे, लोकनायक रुग्णालयातील ५० ते ७० निवासी डॉक्टर आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे १५० निवासी डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्यांना वेगळे केले जाणार नाही. अशा आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी घट्ट मास्क घालून काम करावे आणि जास्तीत जास्त सामाजिक अंतर राखावे.

सरकारने क्वारंटाईन ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचनांचा पुनर्विचार करावा. आता ७०० हून अधिक डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना एकत्र ड्युटीवर बोलावू नये. डॉक्टरांना दोन किंवा तीन भागांमध्ये बोलावले पाहिजे. ज्यामुळे कोणत्याही शिफ्टच्या डॉक्टरांना संसर्ग झाल्यास त्यांची जागा दुसरी टीम घेऊ शकेल, असे राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे निवासी डॉक्टर मनीष जांगरा म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:27 PM 11-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here