बिजघर-आंबवली रस्त्याची दुरवस्था

0

खेड : तालुक्यातील बिजघर- आंबवली या रस्त्याची गेले अनेक वर्ष डागडुजी न करण्यात आल्याने हा रस्ता पूर्ण वाहून गेला असून या रस्त्यावरून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.

या रत्याची वेळेत डागडुजी केली गेली नाहीत तर या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बिजघर येथील नागरिकांनी रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी संबंधित विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने येथील ग्रामस्थांनी आता जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

या बाबतची माहिती देताना बिजघर येथील निवृत्त पोलीस अधिकारी रमेश भोसले आणि नारायण भोसले यांनी सांगितले, या रस्त्याची निर्मिती 1967 साली लोकसहभागातून करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे खोपी विभाग आंबवली विभागाला जोडला गेल्याने या दोन्ही विभागातील ग्रामस्थांची दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय चांगली सोय झाली. खोपी शिरगावमार्गे चिपळूण तालुकाही या रस्त्यामुळे आंबवली विभागाला जोडला गेला. त्यामुळे चिपळूण येथून खेड तालुक्यातील आंबवली विभागात जाण्याचे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ आणि पैसाही वाचू लागला.

चिपळूण तालुक्यासह खोपी शिरगाव परिसराला जोडणारा हा रस्ता बहुउद्देशिय मानला जातो. मात्र गेल्या अनेक वर्षात या रस्त्याची डागडुजीकडे लक्षच दिले गेले नसल्याने सध्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याचे रूपांतर नाल्यात होत असल्याने रस्त्यावरून चालणेही शक्य होत नाही. रस्त्याची दुरवस्था असल्याने एसटी महामंडळाने या मार्गावरील एसटी सेवाही बंद केली आहे. त्यामुळे या रस्त्यालगतच्या अनेक गावातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या भागात एकादी व्यक्ती आजारी पडली आणि त्या व्यक्तीला जर खेड शहरात वैद्यकीय उपचारांसाठी आणायचे झाले तर रुग्णांच्या नातेवाईकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. रुग्णाला खासगी वाहनाना खेडला आणायचे झाल्यास मोठ्या आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. शिवाय खड्डेमय रस्त्यातून रुग्णाला जेव्हा आणले जाते तेव्हा रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो.

बीजघर आंबवली या बहुउद्देशीय रस्त्याची डागडुजी करून या मार्गावर पुन्हा एसटी सेवा सुरु व्हावी यासाठी येथील ग्रामस्थांनी संबंधित विभागाचे उंबरठे झिजवले. मात्र संबधीत विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्याने येथील ग्रामस्थांनी अखेर रस्त्याच्या कामासाठी जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:28 PM 13-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here