देवगड – मलवाहू ट्रक अडकून पडल्याने वाहतूक दहा तास ठप्प

0

नांदगाव : देवगड – निपाणी राज्यमार्गावर असलदे-शिवाजीनगरनजीक मलवाहू ट्रक विचित्ररीत्या अडकून पडल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल दहा तासाहून अधिक ठप्प झाली होती. हा ट्रक देवगडच्या दिशेने जाताना मार्ग चुकल्यामुळे पुन्हा नांदगावच्या दिशेने येत असताना साईडपट्टीवर रुतल्याने हा प्रकार घडला. ही घटना गुरुवारी पहाटे 1 वा. घडली. देवगड-निपाणी राज्य मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडे पडणे, वाहने साईडपट्टीवर रुतणे असे प्रकार घडत आहेत. यामुळे या राज्य मार्ग वाहतूक कोंडी ही नेहमीचीच समस्या बनली आहे.  गुरुवारी पहाटे 1 वा. मुंबईच्या दिशेने जाणारा एक माल ट्रक नांदगाव वरून देवगडच्या दिशेने गेला. असलदे-शिवाजीनगर येथे ट्रक आला असता आपण मार्ग चुकल्याचे चालकाच्या लक्षात आले. यासाठी चालकाने पुन्हा नांदगावच्या दिशेने जाण्यासाठी ट्रक वळविण्याचा प्रयत्न केला असता ट्रक साईडपट्टीवर रूतला. चालकाने शर्तीचे प्रयत्न करूनही ट्रक बाहेर आला नाही. रात्री एकची वेळ असल्याने मदतीलाही कोणीही मिळणे शक्य नव्हते. यामुळे सकाळपर्यंत ट्रक तसाच अडकून पडला होता.ट्रक असा अडकून पडला होता की फक्त दुचाकी वाहने जाण्यासाठी जागा होती. मात्र, चारचाकी व मोठ्या गाड्या तशाच अडकून पडल्याने अनेक देवगड व नांदगावच्या दिशेने जाणा-या प्रवाशांचे पूरते हाल झाले. अनेकांनी दुसरी वाट काढत देवगड गाठले तर पलिकडच्या प्रवाशांनी असलदे-शिवाजी नगर ते नांदगाव हे एक किलोमीटरचे अंतर पायी पार करीत  नांदगाव गाठले. कणकवली, निपाणी,तळेरे वरून व देवगड वरून नांदगाव येणार-या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गुरुवारी मध्यरात्री 1 वा. अडकलेला हा ट्रक तब्बल दहा तासांहून अधिक शर्तीचे प्रयत्न करून सकाळी 11 वा. बाहेर काढण्यात आला. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. विचित्ररित्या अडकून पडलेल्या या ट्रकमुळे राज्य मार्गावरील प्रवासी व वाहनचालकाचा चांगलीच दमछाक झाली. येत्या पावसाळ्यात काही दिवसांपूर्वी  देवगड-निपाणी राज्य मार्गावर बावशी फाटा येथे अशाचप्रकारे ट्रक अडकून पडल्याने वाहतूक ठप्प होण्याची दुसरी घटना घडली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here