लहरी वातावरणामुळे हापूसवर संक्रांत, बागायतदार चिंताग्रस्त

0

रत्नागिरी : अवकाळी पाऊस, बोचरी थंडी आणि पाठोपाठ ढगाळ वातावरण या लहरी वातावरणाने गेल्या आठ दिवसांमध्ये आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.

गुरुवारी (ता. १३) ढगाळ वातावरणामुळे तुडतुडा, फुलकिडा यासारख्या हापूसवरील रोगांना निमंत्रणच ठरले आहे. औषध फवारणी वाढवावी लागत असून, त्यावरील खर्चात भर पडली आहे

उत्तरेकडील थंड वाऱ्‍यामुळे कोकणात तापमानाचा पारा घसरू लागला होता. हापूसला पोषक थंडीही पडू लागली; मात्र अचानक रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले. गुरुवारीही दापोलीत काहीवेळ पाऊस पडला. उशिराच्या टप्प्यात आलेल्या मोहोरामध्ये पावसाचे पाणी साचून बुरशीजन्य रोगांची भीती होती. त्यापासून वाचण्यासाठी बागायतदारांना बुरशीनाशकांची फवारणी करावी लागली. सुरुवातीच्या टप्प्यातील दोन ते तीन फवारण्या करणारा बागायतदार अवकाळीपासून संरक्षण व्हावे, म्हणून चार ते पाच फवारण्या करतोय. अवकाळी पावसानंतर लगेचच कडाक्याची थंडी पडली.

दापोली, खेडमध्ये पारा ९ ते १० अंश सेल्सियसपर्यंत खाली आला. जिल्ह्यात सगळीकडेच दिवसाचा पाराही घटलेला होता. थंडीमुळे अनेक बागांमध्ये जुन्या मोहोराला पुन्हा मोहोर आला आहे. त्यामुळे जुना मोहोर आणि त्याला आलेली कैरी गळून जात आहे. आधीच बदलत्या हवामानाचा फटका हापूसच्या उत्पादनाला बसणार आहे. अवकाळीमुळे फवारणीच्‍या खर्चात वाढ झाली असून, मोहोर खुडून टाकण्यासाठी मजुरीवर खर्च करावा लागत आहे. एका फांदीला चार मोहोर आल्यामुळे गळ वाढणार आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंतही ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे मोहोरासह कैरीवर तुडतुडा पडणार आहे. काही ठिकाणी फुलकिड्यांचा (थ्रिप्स) प्रादुर्भाव होणार आहे. त्यामुळे फवारणीचा खर्च वाढणार आहे. अवकाळी पावसामुळे फळावर काळे डाग पडले आहेत. काही ठिकाणी कैरीची गळही झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:13 PM 14-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here