पर्ससनीनेटधारकांच्या जाचक कायद्याविरोधात मार्ग काढणार : बाळ माने

0

रत्नागिरी : गेले तेरा दिवस पर्ससीननेटधारक मच्छीमार मालक उपोषण करत आहेत. पण पालकमंत्री, आमदार, खासदारांना त्यांची विचारपूस करायला वेळ नाही. पर्ससनीनेटधारक याचक झाले पाहिजेत, आपल्या पायाशी आले पाहिजेत, याकरिता या अडचणी आणल्या जात आहेत, अशी राज्य सरकारची भूमिका दिसते. त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही माजी आमदार बाळ माने यांनी दिली.

सुधारित मच्छीमार कायद्यातील जाचक अटींविरोधात रत्नागिरी जिल्हा आणि तालुका पर्ससीननेट असोसिएशनच्या वतीने रत्नागिरीत गेल्या ३ जानेवारीपासून सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरू आहे. उपोषणाला बसलेल्या मच्छीमारांची भेट माने यांनी शनिवारी घेतली. त्यानंतर ते बोलत होते.

ते म्हणाले, अंधेरनगरी चौपट राजासारखे तिघाडी सरकार राज्यात काम करत आहे. त्यामुळे राज्य सरकारचा मी निषेध करतो. राज्याच्या ७२० किमीच्या किनारपट्टी क्षेत्रातून परकीय चलन मिळवून देणाऱ्या पर्ससीननेटधारकांना मी पाठिंबा देत आहे. त्यांची अडचण समजून मार्ग काढला पाहिजे. याकरिता अधिकारी, मंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनाही मी भेटणार आहे.

नव्या वर्षात नाइलाजाने आंदोलन करावे लागत आहे. मासेमारी करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मंत्री, अधिकाऱ्यांना निवेदन दिली, डॉ. सोमवंशी अहवाल जुना झाला आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे दर पाच वर्षांनी मासेमारी व्यवसायाचे पुनसर्वेक्षण व्हावे आणि सुधारणा व्हाव्यात. परंतु त्याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सांगितले होते की, दोन वर्षांत काय होते, याचे परीक्षण करून कायद्याच्या चौकटीतून न्याय देऊ. परंतु एकतर्फीपणाने सागरी नियमन कायद्यात सुधारणा करून राज्य सरकारने अन्याय केला आहे. याचा त्रास अहोरात्र मेहनत घेणाऱ्या मच्छीमार, खलाशी, मच्छीविक्रेत्या महिलांना होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीलक्रांतीसाठी विविध योजना आणल्या. देशाला परकीय चलन मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही योजना आणल्या आहेत. डोलनेट, पर्ससीननेट, ट्रॉलिंगवाले यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. याकरिता राज्य सरकारने केंद्र सरकारची मदत घेतली पाहिजे, असेही माने म्हणाले.

माने म्हणाले की, माझे वडील कै. यशवंतराव माने यांनी १९५४ पासून मच्छीमारी केली. मीसुद्धा हा व्यवसाय केला आहे. आज दुसऱ्या, तिसऱ्या पिढीतील लोक यामध्ये आहेत. मी आमदार असताना आणि नसतानाही मच्छीमारांचे प्रश्न समोर आले, तेव्हा राजकारणापलीकडे जाऊन मदत केली आहे. याची जाणीव या मच्छीमारांना आहे. काही लोक जाणीवपूर्वक अडचणी आणत आहेत. मच्छीमार बांधव, भाजपाचा कार्यकर्ता म्हणून आलो आहे. एकजूट करून न्याय मागितला पाहिजे, असे माने यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:17 AM 17-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here