समुद्र खवळल्याने ९९ टक्के नौका बंदरातच

0

रत्नागिरी : १ जूनपासून बंद असलेला मासेमारी हंगाम गुरूवारपासून सुरू झाला असला तरी अद्यापही समुद्र खवळलेला असल्याने ९९ टक्के नौका बंदरातच उभ्या आहेत. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच नौकांनी बंदरातुन समुद्राकडे धाव घेतली. शासकीय मुहूर्त टळल्यानंतर पंधरा दिवसांनी येणारा पारंपारीक नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तालाच मच्छिमार नव्या मोसमाचा श्रीगणेशा करण्याची शक्यता आहे. पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात बिगर यांत्रिक किंवा यांत्रिक पद्धतीने मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात येते. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी मासळी किना-यालगत येऊन अंडी देते. ही मासळी मिळवण्यासाठी अनेकदा मच्छिमार समुद्रात धाव घेतात. परिणामी प्रजनन प्रक्रिया योग्य पध्दतीने होत नसल्याने मागील काही कालावधीपासून मच्छिमार हंगाम तोट्याकडे चालला आहे. गतवर्षी मच्छिमारी बंदीच्या कालावधीत बदल करून केरळसह अन्य किनारपट्टी भागात १ जून ते ३१ जुलै मासेमारी बंदी लागु करण्यात आली. महाराष्ट्रातील समुद्र किना-यावरील सर्व बंदरामध्ये १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीवर शासनाकडूनच बंदी घालण्यात आली. शासनाच्या आदेशाला मच्छिमारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिरकरवाडा बंदरासह लहान आणि मध्यम स्वरूपाची अशी सुमारे ४० बंदरे आहेत. या सर्व बंदरामध्ये मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे दोन महिन्याच्या कालावधीनंतर गुरूवारपासून मासेमारीवर असलेली बंदी उठली. परंतु, मागील काही दिवस कोसळणारा मुसळधार पाऊस आणि गटारी अमावस्येमुळे समुद्राला आलेल्या उधाणाने मच्छिमारांचा शासकीय मुहूर्त चुकवला आहे. अद्यापही समुद्र मोठ्या प्रमाणावर खवळलेला आहे. खोल समुद्रातील पाण्याला प्रचंड करंट असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. लाटांचा माराही मोठ्या प्रमाणावर आहे. अशा परिस्थिीत नौका समुद्रात लोटल्यास लाटांच्या मान्याने नौकांचे नुकसान होण्याची मोठी शक्यता असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. थामुळे अवघ्या काही नौकांनी गुरूवारी मासेमारीसाठी आपल्या नौका समुद्रात ढकलल्या. या नौकांनीही सायंकाळी पुन्हा बंदराचा आधार घेतला. पहील्या टण्यात कोळंबी मिळण्याचा अंदाज मच्छिमारांचा आहे. उर्वरित नौका मालकांनी त्यांचा पारंपारीक मुहूर्त पकडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नारळी पौर्णिमेलाच नव्या हंगामाचा श्रीगणेशा होण्याची शक्यता आहे. पसंसिन बोटींचा मासेमारीचा हंगाम एक महिना उशिराने सुरू होणार आहे. नव्या निर्णयानुसार पसंसिन बोटी १ सप्टेंबरपासुन आपल्या नव्या मासेमारी हंगामाचा शुभारंभ करतील, १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीनंतर पंचवीस वाव अंतराबाहेर मासेमारी करण्यासाठी पर्ससिन नौकांना परवानगी देण्यात आली आहे.
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here