बोरज गावच्या हद्दीत गोवंश हत्या

0

खेड : खेड पोलीस स्थानकांच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गालगतच्या बोरज ग्रामपंचायतीच्या हद्दीत गोवंश हत्या केल्या जात असल्याचे उघड झाले असल्याने तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. जानेवारी 2019 मध्ये अशाच प्रकार पिरलोटे परिसरात महामार्गालगत उघड झाला होता.

यावेळी समाजकंटकांना अटक करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या रास्तारोको दरम्यान पोलीस आणि आंदोलन यांच्यामध्ये झालेल्या झटापटीत दोन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कमर्चारी गंभीर जखमी झाले होते.

मुंबई-गोवा महामार्गालगतच्या बोरज गावातील काही ग्रामस्थ सोमवारी सकाळी शेतीच्या कामासाठी बाहेर पडले असता त्यांना महामार्गालगतच्या परिसरात दुर्गंधी येऊ लागली. हे दुर्गंधी कुठून येते याची पाहणी केली असता महामार्गाच्या लगतच झुडपांमध्ये दोन गोवंश प्राण्यांच्या शरीराचे अवशेष आढळून आले. इतक्या अमानुषपणे पाळीव जनावरांची हत्या करणाऱ्या नराधमांचा पर्दाफाश व्हावा या हेतून ग्रामस्थांनी पोलीस पाटील यांची भेट घेऊन या घटनेबाबत पोलिसांना खबर दिली.

पोलिसांनी या संपूर्ण परिसराची तपासणी केली असता घटनास्थळी पोलिसांना गोवंश प्राण्यांच्या शरीराचे अवशेष आढळून आले. जे अवशेष आढळून आले त्यावरून रविवारी रात्री दोन जनावरांची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी या ठिकाणची कसून तपासणी केली असता या ठिकाणी एका जनावराच्या कानात अडकवण्यात आलेला टॅग मिळून आला आहे. या टॅगवर असलेल्या क्रमांकावरून हे जनावर कुणाच्या मालकीचे असावे याच सहजपणे शोध घेता येणार आहे.

2019 च्या जानेवारी महिन्यात महामार्गावरील पीर लोटे परिसरात अशाच पद्धतीने गोवंश हत्या केली जात असल्याचे उघड झाले होते. येथील ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. गोवंश हत्या करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यास पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने या परिसरातील ग्रामस्थानीच 25 जानेवारीच्या रात्री महामार्गावर पाळत ठेवली होती. रात्री उशिरा गोवंश हत्या करण्यासाठी त्या ठिकाणी जनावरांना आणण्यात आले होते मात्र समाजकंटकांना संशय आल्याने त्यांनी ती जनावरे तिथेच सोडून पलायन केले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 26 जानेवारी रोजी संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना लोटे परिसरातील ग्रामस्थ मात्र पहाटेच्या थंडीत आरोपीना पकडण्यासाठी महामार्गावर ठाण मांडून बसले होते. लोकशाहीने दिलेले हक्कानुसार शांतपणे रास्ता रोको करणाऱ्या ग्रामस्थांवर तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी अचानक लाठीचार्ज करायला सुरवात केली आणि आंदोलक बिथरले. आधीच गोवंश हत्येमुळे संतापलेल्या आंदोलकांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर प्रतिहल्ला करून त्यांना पळताभुई थोडी केली होती. या मध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारे उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेडकर यांच्यासह अन्य पाच पोलिस जखमी झाले होते. पुढे महिनाभर हे प्रकरण अक्षरशः धगधगत होते. या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली होती. गोवंश हत्या करण्या समाजकंटकांच्याही मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले होते. या घटनेनंतर गोवंश हत्या प्रकरणाला आळा बसला होता. तीन वर्षांनी पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाली असल्याने खेड तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:10 AM 18-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here