दापोली-मंडणगड नगरपंचायत निवडणुक: आमदार योगेश कदम यांचे गंभीर आरोप

0

दापोली : दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेनेची आघाडी झाली. मंत्री अनिल परब यांनी या निवडणुकीत याठिकाणचे शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवलं.

मात्र शिवसेनेला याठिकाणी खातेही उघडता आले नाही. तर राष्ट्रवादीने मात्र जोरदार मुसंडी मारली. या निकालावरुन शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनी नाराजी जाहीर करत मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

या निवडणुकीत शिवसेनेला संपवून राष्ट्रवादीला मदत करण्याचे धोरण अनेक नेत्यांनी केल्याने शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा आणि राष्ट्रवादीचे बळ वाढवण्याची खेळी दापोलीत वाढल्याची भीती आमदार योगेश कदम यांनी बोलून दाखवली. शिवसेनेचं खच्चीकरण आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी नीती दुर्दैवाने आमच्या काही नेत्यांची होती आणि ती दापोलीमध्ये यशस्वी झाली असा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

महाविकास आघाडी करायची असेल तर ज्याची ताकद आज जशी आहे तसं जागांचं वाटप झालं पाहिजे असं माझं म्हणणं होतं, ते जर का झालं असतं तर मला महाविकास आघाडी मान्य होती, पण तसं झालं नाही. त्यामुळे घडलं काय ५ वर्ष शिवसेनेची सत्ता ज्या दापोली नगरपंचायतीमध्ये होती, ती आता शिवसेनेकडे नसून राष्ट्रवादीकडे गेलेली आहे, त्यामुळे फायदा राष्ट्रवादीचा झालेला आहे.

जे शिवसेनेच्या एबी फॉर्मवर निवडून आलेले आहेत. त्यातील ६ पैकी ४ हे राष्ट्रवादीचे आहेत. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीमध्ये जेवढं मतदान शिवसेनेला मिळालं होतं, त्यापेक्षा जास्त मतदान आता अपक्षांना मिळालं आहे. याचा अर्थ शिवसैनिक जागेवरच आहे. शिवसैनिकांना हा निर्णय मान्य नव्हता, म्हणून हा लढा चालू असल्याचं आमदार योगेश कदम यावेळी म्हणाले.

मंडणगड नगरपंचायतीबाबत बोलताना आमदार कदम म्हणाले की, मंडणगडमध्ये शिवसैनिकांनी वर्चस्व प्राप्त केलं. ज्यावेळी मंडणगड नगरपंचायतीच्या जागांबाबत निर्णय झाला, तो शिवसैनिकांवर अन्याय करणारा निर्णय होता. त्यामुळेच शिवसैनिकांनी वेगळा गट स्थापन करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि काहीही करून मंडणगड नगरपंचायतीवर भगवा फडकवायचा हा निर्धार केला.

रामदास भाई आणि मी पूर्णपणे या निवडणुकीपासून अलिप्त होतो. प्रचारामध्ये आम्ही कुठेही सहभाग घेतला नाही. मनाला दुःख झालं होतं, शिवसेनेची जास्त ताकद असताना कमी जागा आणि राष्ट्रवादीची ताकद कमी असताना देखील राष्ट्रवादीला जास्त जागा असं जागांचं वाटप करून शिवसैनिकांवर अन्याय केला.

मंडणगडच्या निकालामध्ये जाहीर झालं की, शिवसेना फक्त ४ जागांवर लढली पण तिथे आज शिवसैनिक अपक्ष म्हणून उभे राहिले ते ८ निवडून येतात, म्हणजे सत्ता जवळपास शिवसेनेची एकहाती आली असती, पण नगराध्यक्षच्या निवडणुकीत शिवसेनेचाच नगराध्यक्ष बसेल असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:16 PM 20-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here