पुन्हा टीम इंडिया निराशेच्या छायेत, 242 धावांत संघ गारद

0

न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. भारताचा पहिला डाव 242 धावात गुंडाळण्यात यजमानांना यश आलं. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी मात्र पहिल्या डावात चांगली कामगिरी करताना दिवसाच्या अखेरीस बिनबाद 63 धावांपर्यंत मजल मारली. यजमान संघाचे सलामीवीर टॉम लॅथम 27 तर टॉम ब्लंडल 29 धावांवर खेळत आहेत. भारताच्या पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजाराने प्रत्येकी 54 धावा केल्या तर हनुमा विहारीने 55 धावांचे योगदान दिले. पृथ्वी शॉ चांगल्या लयीत दिसत होता मात्र त्याला जेमीसनने बाद केला. विराट कोहलीने आज पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना निराश केला. तो अवघ्या 3 धावा करून तंबूत परतला. भारताचे 5 फलंदाज असे आहेत जे एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले. यामध्ये मयंक अग्रवाल, कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. हिंदुस्थानी गोलंदाजांनी न्यूझीलंडची सलामीची जोडी फोडण्यासाठी बरेच प्रयत्न केले मात्र ते असफल ठरले. त्यापूर्वी भारतीय फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या हाराकिरीचा फटका संघाला बसला. चहापानानंतर फलंदाजांची न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भंबेरी उडवली. यजमानांच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत भारतीय संघाला 242 च्या पलिकडे जाऊ दिलं नाही. भारतीय संघ या मालिकेमध्ये 0-1 ने पिछाडीवर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने शनिवारीही नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीवर इतकं गवत आहे की मैदानात खेळपट्टी कुठे आहे हे लांबू पाहिल्यास कळतही नाही.याचा फायदा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी व्यवस्थित उचलला. पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या पृथ्वीने या सामन्यात फटकेबाजी करत धावसंख्या वेगाने वाढवण्याचा प्रयत्न केला. ट्रेंट बोल्टने मयंक अग्रवालला माघारी पाठवल्यानंतर त्याने चेतेश्वर पुजाराच्या साठीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शॉला अर्धशतकी खेळीचं मोठ्या खेळीत रुपांतर करता आलं नाही तो जेमिनसनच्या गोलंदाजीवर टॉम लॅथमच्या हातात झेल देऊन माघारी परतला. उपहारानंतरच्या सत्रात तर फलंदाजांनी मैदानात जाऊन परत माघारी येण्याचा सपाटा लावलाय की काय असं वाटायला लागलं होतं कारण भारताचे महत्वाचे फलंदाज झटपट बाद झाले. विराट 3 धावांवर, रहाणे 7 धावांवर तंबूत परतले. यानंतर आलेल्या हनुमा विहारीच्या साथीने चेतेश्वर पुजाराने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पाचव्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. चेतेश्वर पुजाराने यादरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं. हनुमा विहारीनेही त्यापाठोपाठ अर्धशतक झळकावलं. चहापानाच्या सत्राआधी हनुमा विहारी वँगरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. चहापानानंतरच्या सत्रात चेतेश्वर पुजारा मोठा फटका खेळण्याच्या आपली विकेट गमावली.त्यानंतर बाद होणाऱ्या फलंदाजांची रांगच लागली होती. न्यूझीलंडच्या जेमिसनने 5 तर टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 2 बळी टीपले. एक बळी मिळवण्यात निल वँगरला यश आलं.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here